Chhagan Bhujbal : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यामद्ये छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचाही समावेश होता. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 50 टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसी राजकीय आरक्षण देण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी सही केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो, असे भुजबळ म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता. आता त्या विधेयकावर राज्यपालांची सही झाल्याने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न गेण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी सही केली आहे. त्यामुळे राज्यपालांचे आभार मानण्यासाठी आम्ही राजभवनावर गेलो होतो, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, मुख्यंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी विधेयकाबाबत चर्चा झाली.
जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील निवडणुका घेऊ नयेत आणि 50 टक्क्यांच्या मर्यादेत राहून ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात यावं अशा आशयाचं विधेयक महाविकास आघाडीने मंजूर करुन घेतलं होतं. हे विधेयक दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आलं होतं आणि अंतिम मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही यावर चर्चा झाली. राज्यपालांनी आज यावर स्वाक्षरी केली. त्यामुळे त्यांना विनंती न करता आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही राजभवनावर गेलो होतो, असं भुजबळ म्हणाले.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live