मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांनी एक मोठं वक्तव्य केलं. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्याने त्या ठिकाणी भुजबळांची वर्णी लागली अशी चर्चा सुरू आहे. पुढे जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन असं छगन भुजबळ म्हणाले. काँग्रेस फुटली त्यावेळी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो असंही छगन भुजबळ म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना छगन भुजबळांनी अनेक मुद्द्यांवर खुलेपणाचे उत्तरं दिली.
Chhagan Bhujbal On Resignation : ... तर मी राजीनामा देणार
महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांना डावलण्यात आलं होतं. त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज होते. पण पुन्हा पाच महिन्यानंतर छगन भुजबळांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दबाव वाढल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता. त्या मंत्रिपदावर छगन भुजबळांना संधी मिळाल्याची चर्चा सुरू झाली.
भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, "उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं तर माझी काही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय, सन्मानाने मला परत बोलवलं. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले, त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन."
मंत्रिपद देताना या गोष्टीवर चर्चा झाली होती का या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अशा पद्धतीची चर्चा होऊ अगर न होवो, राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार.
Chhagan Bhujbal On Ajit Pawar: मंत्रिपद मिळालं नाही त्यावेळी दादांशी अबोला
पहिल्या वेळी मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर अजितदादांशी अबोला धरल्याची कबुली छगन भुजबळांनी दिली. ते म्हणाले की, "जेव्हा मंत्रिपद मिळालं नव्हतं तेव्हा अनेक विचार येत होते आणि खंत वाटत होती. मी आणि अजितदादा बोलत नव्हतो. अजितदादांच्या घरच्या कार्यक्रमाला गेलो नाही. पण मी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात मी उपस्थित राहिल."
Chhagan Bhujbal Interview : भाजपसोबत जायचं आधीच ठरलं होतं
छगन भुजबळ म्हणाले की, "शरद पवारांनी जेव्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा सुप्रियाला पक्षाचे अध्यक्ष करायचे, सरकारमध्ये जायचे असं ठरलं होतं. यामध्ये पवार साहेब कुठेच असणार नाहीत असंही ठरलं होतं. युतीची सर्व चर्चा करायला जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल पटेल जात होते. भाजपबरोबर जावे यासाठी आमच्या अनेक बैठका झाल्या. त्यामध्ये अनिल देशमुखही होते."
Chhagan Bhujbal On Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनमध्ये भ्रष्टाचार नाहीच
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत छगन भुजबळांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यावर महाराष्ट्र सदनमध्ये भ्रष्टाचार झाला नसल्याचं भुजबळ म्हणाले. महाराष्ट्र सदनाचा एकही रुपया अजूनही कंत्राटदाराला मिळाला नाही. मग भ्रष्टाचार कसा झाला? असं भुजबळ म्हणाले.
मी ओबीसींसाठी लढल्यामुळेच लाडक्या बहिणींच्या सोबत ओबीसींची मतं महायुतीला मिळाली असं छगन भुजबळ म्हणाले.