जळगाव : अनेकदा लहान मुलं काय करतील त्याचा थांगपत्ताही लागत नाही. अनेक यामुळं लहानग्यांचा जीव देखील जातो. अशीच एक दुर्दैवी घटना जळगावमध्ये घडली आहे. च्युईंगम घशात अडकल्याने (chewing gum stuck in throat) शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे.
शाळकरी जीवनात अनेक मुलांना गोळ्या, बिस्किट, चॉकलेट खाण्यासह च्युईंगम खाण्याच्या सवयी असतात. मात्र ही सवय भडगावमधील पांढरटच्या उमेशला चांगलीच महागात पडली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पांढरट गावातील पंधरा वर्षीय उमेश गणेश पाटील या शाळकरी मुलगा च्युईंगम खात असताना ते घशात अडकलं. यामुळं उमेशचा श्वास गुदमरून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
उमेश हा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. भडगाव तालुक्यातील पांढरट गावात राहणार उमेश हा भडगाव येथील लाडकुबाई विद्यामंदिर शाळेत शिक्षण घेत होता. आज दुपारी शाळा सुटल्यावर नंतर पांढरट ते भडगाव रिक्षाने जात असताना कधी तरी च्युईंगंम खाण्याची सवय असलेल्या उमेशने नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांच्या समवेत च्युईंगम खात रिक्षाने प्रवास सुरू केला होता. मात्र याच वेळी च्युईंगम त्याच्या घशात अडकलं. जीव गुदमरू लागल्याने त्याने ते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश मिळाले नाही.
च्युईंगम थेट श्वास नलिकेत अडकल्याने उमेशला श्वास घेणे कठीण झाल्याने त्याला तातडीने भडगाव येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशिर झाला असल्यानं उमेश वाचू शकला नाही. उमेश पाटील या शाळकरी विद्यार्थ्याच्या अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.
जळगाव जिल्ह्यातील या बातम्या देखील वाचा