कोल्हापूर : कर्नाटकात 'जय महाराष्ट्र' बोलण्यावर बंदी घालण्याची भाषा करणाऱ्या मंत्री रोशन बेग यांना महाराष्ट्र- कर्नाटक समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. अरेरावीची भाषा खपवून घेतली जाणार नाही, असं त्यांनी ठणकावलं आहे.


मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र बोलल्यास किंवा कर्नाटक विरोधात घोषणा दिल्यास, पद रद्द करण्याचा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी सोमवारी दिला होता. बेग यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''कर्नाटकाला महाराष्ट्र पाणी, वीज आणि आरोग्याच्या सुविधा ही पुरवतं. त्यामुळे बेग यांची भाषा खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून, वेळप्रसंगी सुप्रीम कोर्टात जाऊ, '' असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकला ठणकावलं आहे. पंढरपूरमध्ये बोलताना अशा प्रकारचे इशारे देऊन कर्नाटक सरकार घटनेचं उल्लंघन करत आहे. याबाबत कर्नाटकला रितसर पत्र लिहून यावर जाब विचारु असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडेंच्या मध्यावधी निवडणुकी संदर्भातील वक्तव्यावरही चंद्रकांत पाटीला यांनी प्रतिक्रिया दिली. माध्यवधी निवडणूक हा खडसेंचा वैयक्तीक निष्कर्ष आहे. सरकार स्थिर असल्याने माध्यवधी निवडणुकीचे कोणतेही संकेत नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चे स्टिकर्स


‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद रद्द, बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींची गळचेपी