मुंबई: उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टिका केलीय. बाळासाहेब हे लढवय्ये होते पण उद्धव ठाकरे आता रडोबा झालेत. तसंच नैतिकता उद्धव ठाकरेंना शोभत नाही अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे केवळ राडोबा झाले आहेत. लोकांना रडोबाचे राजकारण चालत नाही. रडोबाच्या राजकारणाने विकास होत नाही, ज्यांच्या रक्तामध्ये विकास, दूरदृष्टी आणि पक्ष नेतृत्व करण्याची क्षमता नाही. स्वतः शरद पवरांना वाटते की, निर्णय चुकला. महाविकास आघाडीचा नेता अशा व्यक्तीला बनवलं ज्याला स्वत:चा पक्ष नीट सांभाळता आला नाही. त्यामुळे मला वाटते उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.
संजय राऊतांना आमचे नितेश राणे धुवून काढतात
संजय राऊत अंघोळीसाठी साबण काँग्रेसचा वापरतात पावडर राष्ट्रवादीची वापरतात आणि शिवसेनेला धुवून काढतात. संजय राऊतांना आमचे नितेश राणे धुवून काढतात, असे म्हणत राऊतांवर टीका केली. तसेच पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या भाष्यावर देखील बावनकुळे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना जिथे जायचे तिथे जावे. त्यांना आता कामच राहिले नाही. दिवसभर आता फक्त पुस्तक चाळण्याचे काम त्यांच्याकडे आहे, असे देखील ते म्हणाले.
अजित पवार आमच्या संपर्कात नाहीत
दररोज पक्ष प्रवेश सुरु आहेत. मंगळवारी प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश आहेत. अजित पवार आम्हाला सहा महिन्यात भेटले नाहीत. ते आमच्या संपर्कात नाहीत आम्ही त्यांच्या संपर्कात नाहीत. त्यांनी स्वतः जाहीर केलं ते राष्ट्रवादीत राहणार आहेत. महाविकास आघाडीतील काही नेते अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करून डॅमेज करत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमुळे लांबणीवर पडल्या
स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे लांबणीवर पडल्या आहेत. मविआने चुकीच्या पद्धतीने जागा वाढवून घेतल्या तो निर्णय आम्ही रद्द केला. यामुळं ते कोर्टात गेले आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कोर्टातील केस मागे घ्यावी उद्या निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.
सहा तास विकासाची सहा तास पक्षासाठी उपक्रम राबवणार
राज्याचे दहा मंत्री देवेंद्र फडणवीसांसह दर शुक्रवारी राज्यातील जिल्ह्याचा प्रवास करणार आहे. सहा तास विकासाची सहा तास पक्षासाठी हा उपक्रम राबवणार आहे. विकास आणि संघटनात्मक मुद्यावर हा दौरा केला जाणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.