Chandrashekhar Bawankule : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांना भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नानंतर रणजितसिंह मोहिते पाटलांनी मान खाली घातल्याचं पाहायला मिळालं. याव प्रश्नावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय अनुशासन समितीकडे बोट दाखवल्याचं पाहायला मिळालं.
रणजितसिंह मोहिते पाटलांना पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. माढा लोकसभा निवडणुकीत आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात नाराजी पसरली होती. त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. या पत्रकार परिषदेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी कारवाई प्रकरणी मंत्री बावनकुळे यांना प्रश्न विचारताच रणजितसिंह मोहिते पाटलांनी मान खाली घालून बसणे पसंद केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना उत्तर देताना केंद्रीय अनुशासन समितीकडे बोट केले.
नेमकं प्रकरण काय?
लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला होता तर विधानसभेला शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना विजय केल्याचा आक्षेप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यानंतर आमदार मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये 1000 सदस्य नोंदणी करुन त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करुन घेतल्याबद्दल मोहिते पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केल्याचे पत्र दिले होते. या पत्रात भाजपाचे अंत्योदयाचे धोरण जनमानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो असे म्हटले होते.
रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा, राम सातपुतेंची मागणी
दरम्यान, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांना देखील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी राम सातपुते यांनी केली होती. तसा ठरावही एका सभेत त्यांनी घेतला होता. मात्र, अद्यापपर्यंत रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाकडून कोणतीही कारवाई झाली नाही.
महत्वाच्या बातम्या: