Chandrashekhar Bawankule : शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगरची (OperationTiger) चर्चा सुरू असताना आज एक कथित भेटीचे वृत्त समोर आलं. ठाण्यात एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची भेट झाल्याची चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कुठलेही ऑपरेशन टायगर होत नाही. एकनाथ शिंदेकडे उद्धव ठाकरेंचे खासदार गेले असतील तर ते त्यांना माहिती असेल असे बावनकुळे म्हणाले.
Continues below advertisement
मला असं वाटतं विकासाच्या कामासाठी चर्चा भेट झाली असावी
राज्याचे खासदार, आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मतदार संघाच्या कामासाठी भेटत असतात. मला असं वाटतं विकासाच्या कामासाठी चर्चा भेट झाली असावी असे बावनकुळे म्हणाले. चर्चा काही पण असू शकते. जर ते नाराज असतील तर उद्धव ठाकरेंना चांगलं माहित असेल पण राज्यात ऑपरेशन टायगर नाही असे बावनकुळे म्हणाले. जवळीक सगळ्यांचीच वाढलेली आहे पण ते आपापल्या कामासाठी वाढलेली आहे असे बावनकुळे म्हणाले.
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत जाण्याच्या चर्चा, अरविंद सावंतांचं स्पष्टीकरण
उद्धव ठाकरे शिवसेनेचे 8 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यात अरविंद सावंत यांचेही नाव समोर आले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीत लगेच पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला. त्यांनी माध्यमांवर आगपाखड केली. त्यांनी यावेळी अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया दिली. शिवसेना कुणाची यावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुद्दाम अशा चर्चा घडवून आणल्या जात असल्याचा दावा सावंतांनी यावेळी केला. उद्धव सेनेतून शिंदे सेनेत कोण कोण जाणार त्या 8 जणांमध्ये माझा पण फोटो आहे. कालपर्यंत माझ्या सहकाऱ्यांची नावं देत होती. आज माझाही फोटो दिला. आमचं नशीब आहे की, अनिल देसाई यांचं नाव वगळलं आहे. या बातमीचा कडाडून निषेध करतो. देशातील जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे की खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. एका जरी ठिकाणी त्यांच्या पक्षाचा कॉल आला असेल अथवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन. एक लक्षात ठेवा मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे हे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात, त्या पक्षाचा मी शिवसैनिक आहे. मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या एका फोन कॉलवर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केलं. तर उद्धव ठाकरे यांनी मला खासदार केलं आहे. गद्दारांच्या बाबतीत काय विचार आहे हे समजून घ्या अगोदर असे सावंत म्हणाले.
Continues below advertisement