मुंबई : काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे, या वक्तव्यानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर काँग्रेस आमदार यांनी केलेला आरोप खरा असेल तर तत्काळ काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं अशी मागणी काँग्रेसकडे केली होती. त्यानंतर आज थेट काँग्रेस मंत्री आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात जवळपास पाऊण तास भेट घेऊन चर्चा केली. या चर्चांमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे ओबीसी आरक्षण प्रश्नी तत्काळ पाऊल उचलण्यात यावं. इम्पीरिकल डेटा डिसेंबरच्या आत गोळा करून तत्काळ ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करावं, अशी मागणी बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्याकडे केली. 


याबाबत अधिक बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी काल काँग्रेसकडे सत्तेतून बाहेर पडा अशी मागणी केली होती आणि आज लगेचच मी ओबीसी नेते आणि काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे. विजय वडेट्टीवार यांनी इम्पीरिकल डेटाचा विषय पुढील आठवड्यातील कॅबिनेटमध्ये घेणार असल्याचं म्हटलं आहे. तशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. यानंतर मी बाळासाहेब थोरात यांची देखील भेट घेणार आहे. काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी ओबीसी आरक्षण विरोधी आहे हे केलेलं वक्तव्य खूपच गंभीर आहे. ओबीसी आरक्षण मिळू नये यासाठी मंत्रालयात काही झारितील शुक्राचार्य आहेत. सरकारची इच्छा असेल तर इम्पीरिकाल डेटा 2 महिन्यात गोळा होऊ शकतो. फडणवीस सरकारने मराठा आरक्षणावेळी 2 महिन्यांत इम्पीरिकल डेटा गोळा केला होता. 


दरमान्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीबाबत बोलताना ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की,आज आमची पाऊण तास चर्चा झाली. ओबीसी राजकिय आरक्षण बाबत चर्चा झाली. आम्ही लवकरच जनगणना करणार आहोत. मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे वाटेल ते करा. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष मिळून आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आमदार अभिजित वंझरी यांची माहिती अपुरी आहे. त्यामुळे त्यांनी तसं वक्तव्य केले आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी कोकणाला केलेली मदत पूरेशी नाही असं वक्तव्य केलं तर मला वाटतं फडणवीस यांचं जे काम आहे ते त्यांनी केलं आहे. नाहीतर त्यांना विरोधक म्हणणार कोण. आम्ही घरं पडले आहेत त्यांना दीड लाख रुपये देत आहोत. जर मदत कमी मिळाली असं विरोधी पक्ष नेत्यांना वाटत असेल तर ते त्यांचं काम आहे. त्यांची तीच विरोधकाची भूमिका असायला हवी. दरमान्य कोकणात अनिल परब यांनी वाटलेले चेक यासाठी माघारी घेतले होते कारण त्यातील काहींचे खातेक्रमांक चुकले होते. बाकी अफवा आहेत. त्यामध्ये काहीच तथ्य नाही. आम्ही पुरग्रस्तांच्यासोबत आहोत.