Maharashtra Temperature Today : राज्यात एकीकडे अवकाळी पावसामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. राज्यात एकीकडे पावसाच्या कोसळधारा पडत आहेत. तर दुसरीकडे उन्हाच्या चटक्यामुळे उष्णता वाढली असून अंगाची लाही लाही होत आहे. चैत्र महिना सुरु झाला की उष्णता वाढू लागते. जगातील सर्वात जास्त तापमानाची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. चंद्रपूरमध्ये आज 43.2 अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  जगभरात सर्वाधिक तापमानाच्या पहिल्या 15 ठिकाणांमध्ये आठ शहरे भारतातील होती. चंद्रपूर तब्बल 43.2 अंश से. तापमानासह पहिल्या क्रमांकावर होते. त्यानंतर पश्चिम आफ्रिकेतील कोल्डा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


गेले दोन दिवस आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. त्यात विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंश  से.हून पुढे गेले आहे. गुरुवारी चंद्रपूर येथे या ऋतूमधील सर्वाधिक 43.2 अंश से. तापमान नोंदले गेले. वर्ध्यामध्ये 42.2 अंश से. तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा जगातील सर्वात उष्ण शहरामध्ये नवव्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरात देशातील आठ शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरे आहेत. वर्धा आणि चंद्रपूर या दोन ठिकाणाचा जगातील सर्वाधिक उष्ण ठिकाणामध्ये सहभाग झालाय.




एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून चंद्रपुरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. सलग तीन दिवस चंद्रपूरमधील तापमान 40 पेक्षा जास्त आहे. 11 एप्रिल रोजी चंद्रपूरचे तापमान 41 अंश सेल्सिअस होते, तर  बुधवारी 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आज हे तापमान 43 पेक्षा जास्त झाले. येत्या काही दिवसात चंद्रपूरच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.तापमानाच्या वाढीमुळे अगदी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. अनेक जण दुपारी बाहेर निघणे टाळत असल्याने रस्त्यावरही रहदारी कमी झाल्याचे दिसून येत आहे. दुपारीच नव्हे, तर रात्री आणि पहाटेही हवेत चांगलाच उकाडा जाणवतो आहे. विदर्भ, मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात तापमान चाळीशीच्या मागेपुढे झुलत होते. उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ होरपळत आहे. आज विदर्भातील तापमान चाळीसीच्या पुढे राहिले. 


अकोला 40.3
अमरावती 41.4
ब्रहमपुरी 43
चंद्रपुरी 43.2
गोंदिया 40.4
नागपूर 41.0
वर्धा 42.2
वाशिम 39.8
यवतमाळ 4.5 
गडचिरोली 38