चंद्रपूर : दिवसा किंवा रात्रीही गस्त घालत असताना पोलिस लहान-लहान गल्ल्यांमध्ये जात नाहीत, अशा तक्रारी सातत्याने नागरिकांमधून होत असतात. यावरच चंद्रपूर पोलिस अधिक्षकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. 'सायकल गस्त' ही संकल्पना अंमलात आणली आहे.


चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक नियती ठाकर यांनी 'सायकल गस्त' नावाची संकल्पना मांडली असून, सध्या संकल्पनेची चाचपणी करण्यासाठी शहरातील चंद्रपूर पोलिस स्टेशन आणि रामनगर पोलिस स्टेशनमध्ये प्रत्येक दोन-दोन सायकल देण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणावर अरुंद गल्ल्यांचं जाळं पसरलं आहे. या गल्ल्यांमध्ये चारचाकी गाड्या किंवा दुचाकी गाड्यांना जाण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांना या गल्ल्यांमधून जाताना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे चंद्रपूर पोलिस अधिक्षकांची 'सायकल गस्त' संकल्पना नक्कीच महत्त्वाची ठरणार असल्याचे दिसून येते आहे.

'सायकल गस्त' संकल्पनेअंतर्गत दोन पोलिस मार्शल आपापल्या बिटमध्ये सायकलने गस्त घालत प्रत्येक गल्ली पिंजून काढतील. शिवाय, या संकल्पनेचा दुसरा फायदा असा की, पोलसांचं आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होईल.

चंद्रपूर शहर आणि रामनगर या दोन पोलिस स्टेशनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दोन-दोन सायकल देण्यात आल्या असून, संकल्पनेची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. इथे या संकल्पनेचा फायदा दिसून आला किंवा प्रयोग यशस्वी झाला, तर जिल्ह्यातील इतर पोलिस स्टेशनमध्येही सायकल वाटप करण्यात येणार आहेत.