चंद्रपूर : चंद्रपूरच्या राजुरातील वसतिगृहात झालेल्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनींविषयी संवेदनशीलता दाखवण्याची अपेक्षा असताना काँग्रेस नेत्यांनी बेजबाबदारपणाचं वक्तव्य केल्याची टीका होत आहे. पॉस्को कायद्याअंतर्गत शासनाकडून तीन-पाच लाखांची मदत मिळत असल्यामुळे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंदवण्यासाठी पालक पुढे येत आहेत, असं वक्तव्य काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत केलं.
'निर्भया' किंवा पॉस्को कायद्याअंतर्गत राज्य सरकारकडून तीन किंवा पाच लाख रुपयांची मदत मिळते. त्यामुळे अनेक तरुणी आणि त्यांचे पालक गुन्हा नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत, हासुद्धा पब्लिसिटीचा धंदा झाला आहे, असं वक्तव्य करताच सुभाष धोटेंवर असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याची टीका व्हायला लागली.
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सुभाष धोटेंची री ओढली. पॉस्को अंतर्गत मदत मिळणार असल्यामुळे तक्रारकर्त्यांची संख्या वाढली, तपासणीनंतर नेमकी किती मुलींच्या बाबत ही दुर्दैवी घटना घडली, हे समोर येईल, असं आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपूरच्या राजुरातील एका शाळेच्या वसतिगृहात सात अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचं वैद्यकीय तपासात स्पष्ट झालं आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ राजुरात मूकमोर्चा तर, लक्कडकोट येथे महाराष्ट्र- तेलंगणा आंतरराष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता. अत्याचार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. या प्रकरणात 6 पीडित मुलींनी तक्रार दिली असून या आधारे पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदवून 4 जणांना ताब्यात घेतलं आहे.
तीन-पाच लाखांच्या मदतीसाठी बलात्काराच्या तक्रारीत वाढ, काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्याने संताप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Apr 2019 09:16 PM (IST)
पॉस्को कायद्याअंतर्गत राज्य सरकारकडून तीन किंवा पाच लाख रुपयांची मदत मिळते. त्यामुळे अनेक तरुणी आणि त्यांचे पालक गुन्हा नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत, असं वक्तव्य काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -