Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून आतापर्यंत आलेल्या कलामध्ये महायुतीने 221 पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये एकट्या भाजपला 131 ठिकाणी आघाडी मिळाली आहे. भाजपच्या या यशाचा पहिला जल्लोश कोथरूडमध्ये झाल्याचं दिसून आलं. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी लाडू वाटून विजयाचा जल्लोष केल्याचं दिसून आलं. ही आकडेवारी सकाळी 11.10 मिनिटांपर्यंतची असून त्यामध्ये अपडेट्स येत आहेत.
उद्धव ठाकरे जर महायुतीमध्ये आले तर त्यांचे स्वागतच असेल असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. उद्धव ठाकरे जर महायुतीमध्ये येत असतील तर त्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असंही ते म्हणाले.
कोथरूडमधून स्वतः चंद्रकांत पाटील हे आघाडीवर असून त्यांचा विजय आता निश्चित मानल जात आहे. त्याचवेळी यावेळी भाजपची इतिहासातील सर्वात चांगल्या कामगिरीकडे वाटचाल सुरू असून 131 ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर महायुतीने 221 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने 56 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने 35 जागांवर आघाडी घेतली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंतिम निकाल आल्याशिवाय जल्लोष साजरा करू नये असं वरिष्ठांकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्याचवेळी भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी मात्र जल्लोषाला सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या कोथरुडमधील कार्यालयामध्ये 200 किलो लाडू आणण्यात आले आहेत.
दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसचे अनेक नेते पिछाडीवर पडल्याचं दिसून आलं. त्यामध्ये बाळासाहेब थोरात हे सुरुवातीपासून पिछाडीवर असल्याचं दिसतंय.
मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेचे वेगवान, अचूक निकाल तुम्हाला सकाळपासूनच एबीपी माझावर पाहता येणार आहेत... प्रत्येक मतदारसंघात कुणी मारली बाजी? कोण होणार तुमचा आमदार? कुणाची येणार सत्ता? काय घडामोडी घडणार? राष्ट्रपती राजवट लागणार का? कोण होणार किंगमेकर? या सर्व प्रश्नांची उत्तर, सविस्तर विश्लेषण.. तुम्हाला 'माझा'वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections/amp वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील.
एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.