बेळगाव : ‘जय भवानी, जय शिवाजी'च्या गगनभेदी घोषणा, झांज, पथक आणि ढोल पथकाचा दणदणाट, चित्ररथावर साकारलेले शिवाजी महाराजांचे जिवंत देखावे, रस्त्यावर घोड्यावरून रपेट करणारे शिवाजी महाराजांमुळे शिवजयंतीची चित्ररथ मिरवणूक संस्मरणीय ठरली.
चित्ररथ मिरवणुकीच्यावेळी बेळगावातील रस्त्यावर साक्षात शिवसृष्टी अवतरल्याचा अनुभव शिवप्रेमींनी घेतला. ऐतिहासिक देखावे आणि समाज जागृती करणारे देखावेही शिवप्रेमींच्या उत्सुकतेचे विषय ठरले.
नरगुंदकर भावे चौकातील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन अध्यक्ष दीपक दळवी, महापौर सरिता पाटील, उप महापौर संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार सुरेश अंगडी, जिल्हाधिकारी एन. जयराम, पोलिस आयुक्त सौमेंदू मुखर्जी, पालिका आयुक्त जी. प्रभू, कार्यकारी अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनीही आरतीत सहभाग घेतला.
पालखी निघाल्यावर चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. झांज पथक, ढोल पथक, वारकऱ्यांचे भजनी पथक, बँड, सनई-चौघडे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल पथकातील तरुणीचा ढोल वाजविण्याचा जोश उपस्थितांची दाद मिळवून गेला. आग्र्याची सुटका, सिद्धी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडण्याचा प्रसंग, अफजल वध, शिवजन्म सोहळा, गुन्हेगारांना शिक्षा देणारे न्यायप्रिय शिवाजी महाराज, शत्रूंच्या महिलांनाही मानाची वागणूक देणारे शिवाजी महाराज, अफजल वधानंतर दिल्ली आणि विजापूर येथे उडालेला हाहा:कार असे नानाविध जिवंत प्रसंग चित्ररथ देखाव्याद्वारे सादर करण्यात आले.
'झाडे लावा, झाडे जगवा', 'पाण्याचा काटकसरीने वापर करा', असे संदेश एका चित्ररथावर देण्यात आला होता. चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी हजारो बेळगावकरांनी गर्दी केली होती. मिरवणुकीच्या मार्गावर अडीच हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.