मुंबई : सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटर प्रकरणी सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन याने सीबीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. सोहराबुद्दीन प्रकरणात सीबीआयने निष्पक्षतेने तपास केला नाही. तसेच सीबीआय आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप रुबाबुद्दीन याने केला आहे. मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात आज रुबाबुद्दीन याची साक्ष नोंदवण्यात आली. रुबाबुद्दीनने आपल्या भावाच्या कथित एन्काऊंटरचा सर्व घटनाक्रम न्यायाधीश एस.जे शर्मा यांच्या समोर मांडला. माझ्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत असलेले तुलसीराम प्रजापतींना भेटलो. त्यांना मी विचारलं की, पोलिसांनी माझ्या भावाला आणि वहिनीलाच का मारलं? त्यावर तुलसीरामने सांगितलं की, मी हिंदु आहे, म्हणून मला दहशतवादी घोषीत करु शकत नव्हते. असं रुबाबुद्दीन साक्ष देताना म्हणाला. कोर्टातील साक्षनंतर रुबाबुद्दीनने आयपीएस अधिकारी रजनीश राय, गुजरातमधील बिल्डर रमण आणि दशरत पटेल यांची साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी केली. याप्रकरणाची पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पुढील सुनावणीला मुख्य तपास अधिकारी अमिताभ ठाकुर यांची साक्ष होणार आहे.