वर्धाः कुठेही एखाद्याचा अपघात झाला तर आपण त्याच्या मदतीसाठी पुढे धावतो. मात्र मात्र मदतीऐवजी संवेदनेचीच कशी चोरी होते?, याची प्रचिती वर्ध्यात आली. अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यात नेण्याऐवजी त्याची बाईक पळवण्यात आली.


काय आहे प्रकरण?

वर्ध्यात 12 तारखेला अमोल भोयर नावाचे व्यक्ति रात्री कंपनीतून घरी परत येत असताना, त्यांच्या बाईकसमोर कुत्रा आडवा आला आणि बाईकला अपघात झाला. डोक्याला मार लागल्याने अमोल भोयर बेशुद्ध झाले.

मात्र अमोलला दवाखान्यात नेण्याऐवजी चोरट्याने त्यांची बाईक चोरुन नेली. शुद्धीवर आल्यावर पाहिलं तर बाईक नव्हती. अमोल यांनी घटनास्थळावरुन मित्राला फोन करुन बोलावलं. मित्राने त्यांना दवाखान्यात नेलं.

अमोल आणि त्यांच्या मित्राने दोन दिवस बाईकचा शोध घेतला, मात्र बाईक काही मिळाली नाही. आता अमोलने पोलिसात धाव घेत बाईक चोरीला गेल्याची तक्रार केली आहे.

संकटकाळी एखाद्याच्या मदतीला धावून येणं ही आपली संस्कृती आहे. पण समाजात अजूनही विकृत प्रवृत्तीचे लोक आहेत, हे वर्ध्याच्या घटनेनं सिद्ध झालं.