यवतमाळच्या वाघिणीच्या शोधासाठी 'केल्विन क्लेन' परफ्यूम
एबीपी माझा वेब टीम | 31 Oct 2018 06:32 PM (IST)
यवतमाळच्या जंगलात नरभक्षक वाघिणीचा शोध घेण्यासाठी जगप्रसिद्ध 'केल्विन क्लेन' ब्रँडच्या परफ्यूमचा शिडकावा करण्यात येणार आहे.
यवतमाळ : यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीच्या शोधाचे सर्व प्रयत्न थकल्यानंतर आता तिला आकर्षित करण्यासाठी परफ्यूम वापरण्यात येणार आहे. जगप्रसिद्ध 'केल्विन क्लेन' ब्रँडच्या परफ्यूमचा जंगलात शिडकावा करण्यात येणार आहे. हे परफ्यूम वापरलं की महिला पुरुषांकडे आकर्षित होतात, असा केल्विन क्लेनचा दावा आहे. पण आता याच परफ्यूमने यवतमाळमधल्या टी वन वाघिणीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारचा प्रयोग याआधी अमेरिकेत झाला होता. एका बिबट्याला जेरबंद करण्यासाठी याच परफ्यूमचा वापर केला गेला होता. मात्र, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी परफ्यूमने वाघिणीला आकर्षित करण्याचा एकदा केलेला प्रयत्न फेल गेल्याचं सांगितलं. 125 मिलीलिटरच्या परफ्यूमची किंमत 4 ते 5 हजारांच्या घरात आहे. परफ्यूमच्या बाजारातला हा सर्वात प्रतिष्ठित अमेरिकन ब्रॅन्ड आहे. 50 पेक्षा जास्त सुगंधी वनस्पतींपासून या परफ्यूमची निर्मिती होते. या परफ्यूमच्या उग्र वासाकडे अनेक श्वापदं आकर्षित होतात. विशिष्ट झाडांवर या परफ्यूमचा शिडकावा केला जातो आणि त्या ठिकाणी पाळत ठेवली जाते. हत्ती उधळले, कुत्रे थकले, पॅरामोटर खड्ड्यात गेलं, दुसऱ्या वाघिणीच्या मूत्राने टी वन वाघिणीचं दर्शन झालं, पण ती ताब्यात मात्र आली नाही. आता केल्विन क्लेनच्या वासाने वाघांमधली महिला तरी जेरबंद होते का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.