मुंबई: राज्य सरकारकडून लवकरच 3 हजार 165 तलाठ्यांची भरती करण्यात येणार आहे. तसंच 528 महसूल मंडळांची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तलाठी भरतीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


तसंच तलाठ्यावर जवाबदारी असलेल्या गावांची संख्या ही सहापर्यंत आणण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या भरती प्रक्रियेनंतर नागरिकांना जलद सेवा मिळणार असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.

कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या महसूल मंडळासाठी ही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे.

यानुसार पहिल्या टप्प्यात महानगरपालिका, अ व ब नगरपरिषदा तसेच त्याचे परिघीय क्षेत्र आणि क वर्ग  नगरपरिषदा यांचा विचार करुन या नागरी भागातील 415 व आदिवासी क्षेत्रातील 351 अशा एकूण 766 नवीन तलाठी साझे व 128 महसूल मंडळांची निर्मिती 2017-18 या वर्षामध्ये करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 2018-19 मध्ये अ व ब वर्ग गावांसाठी 800 साझे व 133 महसूल मंडळे निर्माण करण्यात येतील, तर 2019-20 व 2020-21 या वर्षात अनुक्रमे 800 व 793 तलाठी साझे आणि 133 व 134 महसूल मंडळांची निर्मिती करण्यात येणार आहे.
आजच्या निर्णयानुसार निर्माण करण्यात येणाऱ्या तलाठी साझे आणि महसूल मंडळांची विभागनिहाय  माहिती पुढीलप्रमाणे:

कोकण- (744 तलाठी साझे) (124 महसूल मंडळे),

नाशिक- (689) (115),

पुणे- (463) (77),

औरंगाबाद- (685) (114),

नागपूर- (478) (80),

अमरावती- (106) (18).