बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील पाळा आश्रमशाळेत आणखी एका मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. हेलखेड या गावाची ही मुलगी असल्याची माहिती समजते आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोसीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, याप्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिली. तसेच या आश्रमशाळेतील 10 जणांना निलंबित करण्यात आलं असून या संस्थेची मान्यताही रद्द करण्यात आली असल्याची माहिती विष्णू सवरा यांनी दिली.
काय आहे प्रकरण?
खामगाव तालुक्यातील पाळा इथं निनाभाऊ कोकरे प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा आहे. इथे पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात. दिवाळीच्या सुट्ट्यामुळे बहुतेक विद्यार्थी गावी गेले आहेत. मूळची जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या एक विद्यार्थिनीही या शाळेत शिकते. ती सुट्टीसाठी घरी आली, तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होत असल्याचं, तिने पालकांना सांगितलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं.
पीडित 10 वर्षीय चिमुकली चौथीत शिकते. तिच्यावर अत्याचार झाल्याचं समजल्यानंतर, पालकांनी हलखेडा गावच्या पोलीस पाटील आणि सरपंचांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याबाबतची तक्रार पोलिसात दिली आणि हे मोठं प्रकरण जगासमोर आलं.
बुलडाण्यातील बाळा शिवार परिसरातील कोकरे आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली होती. विशेष म्हणजे ही घटना दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी घडली आहे.
बुलडाणा बलात्कारप्रकरणी कोणा-कोणाविरोधात गुन्हा?
*इतूसिंग पवार – मुख्य आरोपी
*भरत लाहुडकर – मुख्याध्यापक
*दिगंबर खरात – शिक्षक
*स्वप्नील लाठे – प्रयोगशाळा सहाय्यक
*नारायण आंबोरे – वसतीगृह अधीक्षक
*दीपक कोकरे – आश्रमशाळा मदतनीस
*विजय कोकरे – क्लार्क
*ललिता वजिरे – वसतीगृह अधीक्षक
*मंथन कोकरे – स्वयंपाकी
*राऊत मावशी – स्वयंपाकी
आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार : नवाब मलिक
दरम्यान, बुलडाण्यातील आश्रमशाळेत डझनभर आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे. शिवाय महिलांवरील अत्याचारांच्या घटनांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी नवाब मालिक यांनी केली.
याप्रकरणी सुरुवातील 7 जणांना अटक केली होती. तर गुरुवारी रात्री आणखी 4 जणांना अटक बेड्या ठोकल्या. त्यामुळे आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे.
बुलडाणा: आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना
तपासासाठी एसआयटीची स्थापना
बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिले आहेत. याशिवाय नागपूर सीआयडी विभागाच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग या खामगावला भेट देणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर यांच्या निदर्शनाखाली होणार आहे.
संबंधित बातम्या:
बुलडाणा बलात्कार : आरोपी इतू सिंग आश्रमशाळेसाठी मुली जमवायचा