Buldhana Lok Sabha Constituency : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मतदान (Lok Sabha Election 2024)  प्रक्रिया 26 एप्रिल रोजी पार पडली. मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाला असून त्याचा अंतिम फैसला आता 4 जूनलाच होणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांसह मतदारांनाही या निकालाची उत्सुकता लागली आहे. असे असताना मतदानाच्या वेळी सर्व मतदान कक्षांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मतदान प्रक्रियेचे झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे, अशी मागणी शेतकरी नेते आणि बुलढाणा लोकसभा (Buldhana Lok Sabha Constituency) मतदारसंघातील उमेदवार  रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)  यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.


नेमकं काय म्हणाले रविकांत तुपकर


लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी या संदर्भातील निवेदन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. या निवेदनात नमूद आहे की, मी स्वतः अपक्ष म्हणून 'पाना' या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढविली आहे. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले आहे. मतदानाच्या मतदान कक्षामध्ये मतदान निपक्षपातीपणे, मोकळ्या वातावरणात आणि कायदेशीरपणे पार पडते आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी सर्व मतदान कक्षांमध्ये मतदानाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.


रेकॉर्डिंग मतदानाची वैधता सिद्ध करणारा एकमेव पुरावा


बुलढाणा लोकसभा मतदारसंघा करिता 26 एप्रिल 2024 रोजी मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची सरासरी ही 50 ते 55 टक्क्यापर्यंत होती. मात्र अखेरच्या एका तासामध्ये मतदानाच्या टक्केवारी मध्ये आकस्मिकपणे दहा टक्क्यांची वाढ झालेली आहे. सदर मतदान हे रात्री उशिरापर्यंत चालल्याचे कळते. त्यामुळे सर्व मतदान केंद्रावरील अखेरचे मतदान होऊन मतपेट्या सीलबंद करेपर्यंतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत महत्त्वाचे आहे.


झालेले मतदान हे योग्य प्रकारे झालेले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सर्व मतदान केंद्रांमध्ये झालेले व्हिडिओ रेकॉर्डिंग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सदर व्हिडिओ रेकॉर्डिंग हे मतदानाची वैधता सिद्ध करणारा एकमेव पुरावा आहे त्यामुळे, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेचे करण्यात आलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या