Buldhana News Updates : आपल्या मुलांकडे कितीही लक्ष दिलं तरी ते खोड्या करतच असतात. कधी कधी त्यांच्या या खोड्या जीवघेण्याही होतात. बुलढाण्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. खांबाला रुमाल बांधून खेळत असताना रुमालाचा गळफास लागून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी खामगाव शहरातील मीरा नगर परिसरात घडली आहे. ही बाब आई वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला त्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. पुर्वेश आवटे असं मृत मुलाचं नाव असून तो नेहमी मोबाईलवर युट्युब , इन्स्टाग्रामवर सक्रिय राहत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.


पालकांनो सावधान...!


देशभरात अशा घटना घडत असताना या मागील कारणांचा शोध घेतला असता मुलांच्या हाता मोबाईल देताना काळजी घेतली पाहिजे असंही यातून निष्पन्न झालं आहे. मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळताना किंवा यू ट्युबवर अनेक प्रक्षोभक व्हिडीओ बघताना बाल मनावर विपरीत परिणाम होऊन बाल वयातील मूल कधी कधी घातक पाऊल उचलताना दिसत आहे. आज खामगाव येथील घटनेतील मृतक पुर्वेश हा सुद्धा नेहमी यू ट्युब , इन्स्टाग्राम आणि ऑनलाईन गेम खेळत होता अशी माहिती समोर आली आहे. पुर्वेशने नक्की काय खेळ खेळत होता किंवा अपघाताने त्याला गळफास बसला याची चौकशी पोलीस करतीलही पण मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी सतर्कता बाळगली पाहिजे हे नक्की.


परिवारातील एकुलता एक गमावल्याने समाजमन सुन्न


पुर्वेश आवटे हा आवटे परिवारात एकुलता एक मुलगा होता. या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने समाजमनही हेलावले आहे. पुर्वेशने आईला मी अंगणात खेळतो असं सांगून बाहेर पडला. आडव्या लोखंडी खांबाला रुमाल बांधून खेळत असताना हा दुर्देवी प्रकार घडल्याचं समोर आलंय. खामगाव पोलीस आता याची चौकशी करीत आहे. दरम्यान या घटनेनंतर खामगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.