Budget Session 2022, Sanjay Shirsat  : सत्ताधारी आमदार आणि तालिका अध्यक्षांकडूनच विधानसभेत पोलिसांच्या बदल्यांविषयी खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. आयपीएसपासून कॉन्स्टेबल पदापर्यंत पोलीस बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे शिवसेना आमदार आणि तालिका अध्यक्ष संजय संजय शिरसाठ यांनी सभागृहात सांगितलं. संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत का? आसा प्रश्न उपस्थित झाला आहे.  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संजय शिरसाठ सभागृहात बोलत होते. यावेळी त्यांनी आपला अनुभव सांगितला. गंभीर आरोप करताना संजय शिरसाठ यावेळी असंही म्हणाले की, पैसे वसूल करण्यासाठी पोलीस अधिकारी टार्गेट देतात. यासाठी त्यांचं रेट कार्ड ठरलेलं आहे.


संजय शिरसाठ म्हणाले की, ‘मी तालिका अध्यक्षपदाच्या खुर्चीवर असताना पोलीस बदल्यातील भ्रष्टाचारा विषय समोर आला. तेव्हा मीही माझा अनुभव सांगितला. पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत आहे. आयपीएसपासून कॉन्स्टेबल पदापर्यंत हे व्यवहार होतात. आपले सरकार असले म्हणून चुकीच्या होत असलेल्या गोष्टी बोलायला नकोत का? अन्यथा हे याला आळा कसा बसणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट सांगितली आहे.‘  माझ्या ओळखीतला एक पोलीस अधिकारी गडचिरोलीत होता, ज्याची अडीच वर्षे पूर्ण झाली होती. नियमानुसार इच्छेच्या ठिकाणी बदली होते. परंतु नवी मुंबईत तीन महिने ती पोस्ट रिकामी असतानाही त्याला दिली गेली नाही.परंतु नंतर तो व्यवहार झाल्यावर मात्र बदली झाली, असा अनुभव संजय शिरसाठ यांनी सांगितला.


पोलीस खात्यात मोठे आर्थिक गैरव्यवहार होतात. हे सर्व थांबवलं पाहिजे. बदल्या कशा होतात हे सर्वांना माहित आहे. यावर तात्काळ चौकशी केली जाईल, मुख्यमंत्री गृहमंत्री यावर कारवाई निश्चित करतील आणि मला न्याय मिळेल असा विश्वास आपल्याला असल्याचं संजय शिरसाठ म्हणाले.  दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचे सरकार सध्या महाराष्ट्रात आहे. गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आघाडीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live