नांदेड : नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्ड सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसऱ्याच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तुफान गर्दी झाली होती. यामुळे औरंगाबाद खंडपीठाने आखून दिलेल्या आदेशांची पायमल्ली झाली. म्हणून बोर्ड सदस्यांवर गुन्हांची नोंद झाली आहे.


दसऱ्याच्या दिवशी नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे हल्लाबोल मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीत काही अटी-शर्थींचं पालन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या वतीने देण्यात आले होते. परंतु, कोणत्याही नियमांचं पालन न झाल्यामुळे आणि अलोट गर्दी जमा झाल्यामुळे सचखंड गुरुद्वारा बोर्ड सदस्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि सदस्य यांच्या विरोधात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात एवढी गर्दी जमणं योग्य नाही, तसेच आयोजनाला अटी-शर्थींचं पालन करत परवानगी दिली होती. पण कार्यक्रमात कोणत्याही प्रकराच्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही. दसऱ्या निमित्त ही हल्लाबोल मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.


हल्लाबोल मिरवणुकीसाठी स्थानिक प्रशासनानं परवानगी नाकारली होती. त्यानंतर बोर्डाच्या सदस्स्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मिरवणुकीसाठी परवानगी मिळावी यासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी खंडपीठाकडून मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु, खंडपीठाने काही निकष लावले होते. त्या निकषांचं पालन करणं अत्यंत गरजेचं होतं. परंतु, मिरवणुकीत या नियमांचं पालन न झाल्याचं दिसून आलं.


रविवारी दसऱ्याच्या निमित्तानं ही हल्लाबोल मिरवणूक निघाली. परंतु, या मिरवणुकीत ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक लोकांचा सहभाग असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे अडिच हजार ते तीन हजार लोकांना गुन्हा नोंदवण्यात आला आहे.