मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) (Cleark) पदासाठी 1846 जागांची (Job) भरती निघाली आहे. राज्यभरातून या नोकरीसाठी युवकांनी अर्ज केले आहेत. तर, हजारो युवकांना केवळ बीएमसीने पहिल्या प्रयत्नात दहावी पास होण्याची अट घातल्याने अर्ज भरता आला नाही. बीएमसीच्या या जाचक अटीविरुद्ध राज्यभरातून तीव्र संताप करण्यात आला. तसेच, अनेक दिग्गजांनी व राजकीय नेत्यांनीही आवाज उठवला होता. स्वत: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही याबाबत ट्विटरवरुन ही अट रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, आता बीएमसी प्रशासनाला जाग आली असून भरती प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर बीएमसीने (BMC) एक परिपत्रक जारी करुन सर्वच उमेदवारांना गुडन्यूज दिली आहे. या भरतीसाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यभरातील लाखो युवकांना, उमेदवारांना याचा लाभ होणार आहे. 


बीएमसीकडून आता सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. तसेच, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील,असेही महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या जाहिरातीनंतर विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली. विशेष म्हणजे बीएमसीच्या अधिकृत ट्वविटर हँडलवरुनही याबाबतचे परिपत्रक शेअर करण्यात आलं आहे. 


15 दिवसांत नव्याने जाहिरात


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'कार्यकारी सहायक' (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी 'माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण' ही शैक्षणिक अर्हता लागू होती. तथापि, त्यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.




ज्यांनी अर्ज भरले ते ग्राह्य धरले जातील


बीएमसीकडून सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, 'कार्यकारी सहायक' पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होवून येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'कार्यकारी सहायक' (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील 1846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील,असेही महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI