नाशिक: अनेकदा रक्तदान शिबिरातून रक्त संकलन केले जाते. त्यासाठी लोक वाढदिवस, स्मृतिदिन तसेच विशेष दिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. मात्र आता रक्तदान करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नसून रक्त संकलन टीम थेट रक्तदात्यांच्या दारी येणार आहे.


नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालया मार्फत ही सेवा सुरू करण्यात आली असून यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या आयुष्यात मानवी रक्ताला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे मानवी रक्ताला पर्याय नाही. रक्ताची बाटली अथवा एक पिशवी प्रसंगी काही रुग्णांचे जीव वाचू शकते. रक्त संकलनाचे अनेक उपक्रम राबवले जात असले तरी अनेक वेळा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. अनेकांना रक्तदान करण्याची इच्छा असली तरी दैनंदिन अडचणीतून त्यांना ते शक्य होत नाही, परंतु नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय रक्तपेढीने रक्तदानासाठी कल्पकता दाखवत एक अभिनव योजना राबविण्यास सुरवात केली आहे.


हॉस्पिटल म्हटलं की औषधे, इंजेक्शन यासह रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. अनेकदा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. परिणामी हॉस्पिटल अथवा इतर रक्त संकलन केंद्राकडून रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. अशावेळी लोकांनी रक्तदान शिबिरात केलेल्या रक्त संकलनातून इतरांना पुरवठा केला जातो. मात्र आता रक्तदात्यांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. आता रक्त संकलन टीम थेट रक्त दात्यांच्या घरी जाणार आहे. आणि येथूनच रक्त संकलन करण्यात येणार आहे. 


वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस अथवा कोणाचा स्मृतिदिन असेल एखाद्या संस्थेचा वर्धापन दिन किंवा असाच विशेष काही दिवस असेल तर त्या दिवशी घरबसल्या रक्तदान करता येणार आहे. इच्छुकांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधल्यास अगदी एक दोन रक्तदात्यांसाठीही ब्लड बँकेची व्हॅन तज्ञांसह रक्तसंकलनासाठी आपल्या दारी पोहोचत आहेत.


दरम्यान या उपक्रमासाठी कर्मवीर काकासाहेब वाघ कॉलेज, गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, मोतीवाला वैद्यकीय महाविद्यालय, गजरा फाउंडेशन अशा संस्थांचे पाठबळ लाभत असून रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. रक्तसंकलन टीम आपल्या दारी हा उपक्रम उत्तम प्रशिक्षित शासकीय डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या टीममुळे आतापर्यंत शेकडो रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात झाले आहेत. 


सदर अभिनव उपक्रमाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, ही 365 दिवस रक्त पुरवठा करणारी अभिनव संकल्पना आहे. याद्वारे गरजू रुग्णांना 24 तास रक्त उपलब्ध करून देणे शक्य होत आहे. अधिकाधिक नागरिकांनी रक्तदाना साठी पुढाकार घेऊन या सेवाभावी उपक्रमास हातभार लावावा असं आवाहन संदर्भ सेवा रुग्णालयाचे डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी केलं आहे.