मुंबई: भाजपने कार्यकारिणी बैठकीत आज मराठा आरक्षण प्रस्ताव एकमताने मंजूर केला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला, त्याला एकमताने मंजुरी मिळाली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या प्रस्ताव मांडणार होत्या. मात्र त्यांनी या बैठकीला दांडी मारल्याने चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला.


चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव वाचून दाखवला.

या प्रस्तावात "भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. मराठा आरक्षणासाठी भाजप कटिबद्ध आहे. मराठा समाजात आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण आहे ही वास्तुस्थिती आहे.हे मागासलेपण  दूर करणं गरजेचं आहे. 15 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीने आरक्षण दिलं असतं, मागासलेपण दूर करण्याचा दिशेने पावलं टाकली असती, तर प्रश्न निर्माण झाले नसते.

त्या नेतृत्वाने स्वतःचे खिसे भरण्याचं काम केलं. त्यामुळे आजच्या मराठा समाजाच्या स्थितीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतृत्व जबाबदार आहे". असं म्हटलं आहे.

याशिवाय मराठा समाजाचं आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्न करणार,

रोजगार वाढवणार असंही या प्रस्तावात म्हटलं आहे.

आरक्षण दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. कोर्टात भक्कम बाजू मांडू, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.