महायुतीचं स्वप्न भंगल, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम | 24 Oct 2019 01:49 PM (IST)
अंतिम निकाल हाती येतील तेव्हा महायुतीने 200 जागा जिंकल्या असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर आरपीआयच्या चार जागा येतील असंही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई : बंडखोरीमुळे भाजपाच्या जागा घटताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतल्या लोकांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यातली बंडखोरी वाढली. ज्याचा फटका या दोन्ही पक्षांना निवडणूक निकालात बसला आहे. त्यामुळे भाजपच 220 पारचं महायुतीचं स्वप्न हे भंगलं आहे असं रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 'एबीपी माझा' शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले म्हणाले की काही प्रमाणात हे स्वप्न भंगलं आहे असं म्हणता येईल. मात्र अंतिम निकाल हाती येतील तेव्हा महायुतीने 200 जागा जिंकल्या असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर आरपीआयच्या चार जागा येतील असंही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभा निवडणूक निकाल आज लागत आहे, विविध कल हाती येत आहेत. निकालाच्या या फेऱ्यांमध्ये भाजपाला अनेक ठिकाणी मोठा फटका बसल्याची चिन्हं आहेत. गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपाला 122 जागांवर विजय मिळाल्या होता. या खेपेला भाजपाने 100 जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेनेने 64 जागांवर आघाडी घेतली आहे. 164 जागा मिळून युतीचं सरकार येईल हे निश्चित आहे. मात्र भाजपाच्या जागा गेल्या वर्षीच्या तुलनेत घटल्या आहेत असंच दिसून येतं आहे. त्यामुळे आता भाजपा काय करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेरही जल्लोष नाही तर शुकशुकाट असल्याचं चित्र आहे.