लातूर : भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, हा प्रश्न दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लातूर येथे झालेल्या कार्यक्रमात याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. 'युतीच्या संभ्रमात राहू नका, निवडणुकांच्या तयारीला लागा,' अशा सूचना फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्षाच्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्व 48 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देईल. मित्रपक्षांच्या जागेवरही भाजपचेच उमेदवार असतील. त्यामुळे 48 पैकी 40 जागांवर भाजपचा विजय व्हायला हवा. फडणवीस म्हणाले की, "कार्यकर्ता हाच भाजपची सर्वात मोठी ताकद आहे. कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागायला हवे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 2 कोटी मते मिळायला हवीत, असे झाले तर आपल्याला 2019 साली 2014 पेक्षा मोठा विजय मिळेल. लातूरमध्ये भाजपाच्या बूथ विजय अभियानाला सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वबळाचे संकेत दिल्यानंतर कार्यकर्त्यांना याचे फार आश्चर्य वाटले नाही. व्हिडीओ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वबळाचा नारा | लातूर | एबीपी माझा