Sudhir Mungantiwar : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटेच्या वेळी घेतलेल्या शपथविधीची चर्चा आजही रंगते. यावर वारंवार चर्चा होते. आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देखील यावर थेट भाष्य केलं आहे. एबीपी माझाशी फोनवर बोलताना त्यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना तो निर्णय का घेतला याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. देवेंद्रजींनी मान्य केलं की शिवसेना ज्या पद्धतीनं आमच्याशी युती केल्यानंतर वागत होती. त्या रागाच्या भरात अजित पवारांच्या सोबत गेलो, असं मुनगंटीवार म्हणाले. 

Continues below advertisement

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, लोकं कुणाला काय समजतात हे सर्वांना माहिती आहे. विश्वगौरव नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरुन जेव्हा आपण एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो. निवडणुकीचे निकाल येत असताना 24 तारखेला चार वाजता पत्रकार परिषद घेऊन आश्चर्यजनक वक्तव्य केली गेली. त्या रागाच्या भरात आम्ही अजित पवारांसोबत गेलो, तुम्हाला कोणता राग आला होता? की तुम्ही शरद पवार यांच्यासोबत गेले. मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं नव्हतं. पवारसाहेब त्यांच्या सोबत असताना आमच्याकडून फोन जाण्याचा प्रश्नच नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, आता शिवसेना-भाजप युती आहेच. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार अजूनही शिवसेनेचेच आहेत. आम्ही तर शिंदे यांना रोजच फोन करतो. भाजपची शिवसेनेची युती आहेच. त्यामुळं आमच्याकडून उद्धव ठाकरे यांना फोन जाण्याचा प्रश्नच नाही, असं ते म्हणाले. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जबरदस्ती हात वर करुन मुख्यमंत्री बनवले. भाजपने याआधी युती केलीच होती. त्यामुळं आमचा आता प्रश्नच उपस्थित होतच नाही.

Continues below advertisement

काय म्हणाल्या होत्या किशोरी पेडणेकर दोन्ही पक्षांची युती केवळ मानपानात अडकली आहे, अशी माहिती शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. पहिला फोन कुणी करायचा यावरूनच युती खोळंबलीय असं केसरकर म्हणाले. यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोण फोन करणार याबाबत मी सांगू शकत नाही. मात्र माझ्या पक्षाच्या प्रमुखांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल. आम्ही त्यांच्या निर्णयासोबत असू. मात्र भाजपकडून इतक्या फुटकळ गोष्टीवरुन महाराष्ट्र दावणीला धरु नये. राष्ट्रवादीबरोबर सकाळची शपथ घेणं तुम्हाला पटलं. ती तुटली नसती तर तुम्ही राष्ट्रवादीबरोबर राहिले होते. युती तुटल्यानंतर सत्तांतर घडलं. रात्रीचे छुप्या पद्धतीनं भेटणे या गोष्टी सर्वांनी पाहिलं आहे. मतदारांना तुम्ही येडे समजता का? असा सवाल देखील पेडणेकर यांनी भाजपला केला. शिवसेनेतील घरातील लोकं अशा पद्धतीनं बाहेर गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आशावादी आहोत, असंही पेडणेकर म्हणाल्या.