Pune News : देशात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारला मे महिन्यात 9 वर्षे पूर्ण होत आहेत. आगामी लोकसभा निवडणूक (लोकसभा निवडणूक 2024) लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) देखील या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अनेक राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत खूप गंभीर आहे. कर्नाटकातील पराभवानंतर आता भाजपने महाराष्ट्रात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यात आज ते पुण्यात राष्ट्रीय कार्यकारिणी कोअर कमिटीची बैठक घेणार असून त्यात राज्यस्तरीय कोअर कमिटीचे सदस्य सहभागी होणार आहेत.
पुण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक बालगंधर्व रंगमंदिरात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 ते 5 यावेळेत होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी असे मिळून 1200 च्या आसपास कार्यकर्ते उपस्थित असणार आहे. बालगंधर्व येथील बैठक झाल्यानंतर साडे पाच वाजता राज्यातील खासदार आणि आमदार यांची घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांची तयारी...
महाराष्ट्रात येत्या काळात निवडणुका होणार आहे. त्याच निवडणुकांची तयारी भाजपकडून सुरु झाली आहे. भाजप निवडणुकांसाठी कायम तयार असतं, असं बोललं जातं. निवडणुकांसाठीची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील नेते आणि केंद्रातील अनेक मंत्र्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पुण्यात होणारी ही कार्यकारीणीची बैठक महत्वाची मानली जात आहे.
कसब्यावरुन भाजप धडा घेणार का?
काही दिवसांपूर्वी कसबा विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांचा दणदणीत विजय झाला. 40 स्टार प्रचारक भाजपने प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे रोड शो देखील घेतले. देशाचे गृहमंत्री अमित शाहदेखील या निवडणुकीदरम्यान पुण्यात आले होते. मात्र त्यानंतर भाजपचा 40 वर्षांचा बालेकिल्ला कोसळला आणि कॉंग्रेसनं विजय ओढून आणला. या सगळ्यानंतर पुढील निवडणुकांसाठी भाजपला चांगली कंबर कसावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ही बैठक आणि रणणिती आखणं हे भाजपसाठी जास्त महत्वाचं असणार आहे.