पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी, मराठा आणि अनुसूचित जाती जमातीचा विश्वासघात केला असून यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी घेतली.  आज पंढरपुरातून संत नामदेव पायरी येथे जागर अभियानाच शुभारंभ करण्यात आला. 


यावेळी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री डॉ योगेश कुटे, भाजप आमदार समाधान अवताडे, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते उपस्थित होते. 
 
नामदेव पायरी येथे ठाकरे सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घालून हे नेते कार्यकर्त्यांसह वाजत गाजत मेळावास्थळी दाखल झाले. आजच्या या शुभारंभ मेळाव्याला तुफान गर्दी जमा झाली होती. या मेळाव्यात राज्यातील 350 ओबीसी जातींमधील सर्व समाज बांधवांचा जागर आता सुरू केल्याचे टिळेकर यांनी सांगितले. लवकरात लवकर आमचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसींचा इम्पिरिअल डेटा गोळा करून तातडीने सुप्रीम कोर्टात दाखल करावा अशी मागणी केली. 


राज्यातील सरकारने 100 कोटी वसुलीला यंत्रणा निर्माण होते मात्र ओबीसींचा इम्पिरिअल देता गोळा करण्यासाठी यांच्याकडे यंत्रणा नाही असा टोलाही योगेश टिळेकर यांनी ठाकरे सरकारला लगावला. सरकार ओबसी लोकांना पायदळी तुडवत असून पुढील दीड महिना हा ओबीसींचा जागर राज्यभर घुमणार असल्याचे टिळेकर यांनी सांगितले. ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत केल्या शिवाय निवडणुका घेऊ देणार नाही असा इशाराही योगेश टिळेकर यांनी दिला.