मंबई: माफी मागितल्याशिवाय राणा दाम्पत्यांना बाहेर पडू दिलं जाणार नाही असं म्हणणारे शिवसैनिक गुन्हा करत नाहीत का असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन राणांना बाहेर काढावं. अन्यथा मी स्वत: त्यांना बाहेर काढण्यासाठी जाणार असल्याचं ते म्हणाले. 


नारायण राणे म्हणाले की, "एक खासदार आणि एक आमदार असताना राणा कुटुंबाला संरक्षण पुरवलं जात नाही. पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढावं. अन्यथा मी स्वत: त्या ठिकाणी जाणार आणि राणा कुटुंबाला बाहेर काढणार."


नारायण राणे म्हणाले की, राणा यांच्या जिवाला काही झालं तर त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल. मी राणा यांना मदत करायला जाणार आहे असं नारायण राणे म्हणाले. 


नारायण राणे म्हणाले की, "राज्यात सरकार आहे असे वाटत नाही आणि सरकार हे वातावरण बिघडवत आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे याचं यांना भान आहे की नाही? सत्ता असताना ते घमक्या देत आहेत. राज्यात पोलीस आहेत की नाही हा प्रश्न आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते स्मशानाबद्दल बोलत आहेत. संजय राऊत, अनिल परब सांगत होते राणा यांना मुंबई येऊ देणार नाही. हे फक्त बढाया मारत आहेत. मातोश्री येथे 235 आणि राणा घरी 135 शिवसैनिक आहेत."


दरम्यान, राणा दाम्पत्याला पोलीस घेऊन जातील त्यावेळी त्याला विरोध करु नका. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका असं आवाहन शिवसेना युवा नेते वरुण सरदेसाई यांनी केलं आहे. शिवसेनेला आव्हान देणारा अजून जन्माला यायचा आहे असंही ते म्हणाले. 


दरम्यान, ताज्या माहितीनुसार, राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणे, धर्म, वंश आणि भाषेच्या आधारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि समाजाची शांतता भंग करणे असे आरोप या कलमांतर्गत करण्यात आले आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


 


ABP Majha