पंढरपूर : राष्ट्रवादीने बहुजन गोरगरीब समाजाच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावून घरं फोडली, त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत, अशी टीकाही गोपीचंद पडळकरांनी केली आहे. नियतीचा न्याय इथेच पाहायला मिळतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 


ते म्हणाले की,  मेंढ्यांचे नेतृत्व कधी लांडग्याकडे नसते. आजवर राष्ट्रवादीने गोरगरीब बहुजन समाजाच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला असं ते मंगळवेढ्यामध्ये बोलताना म्हणाले. पडळकर म्हणाले की, राष्ट्रवादी खूप हुशार आहे. त्यामुळेच नेहमी गृहमंत्री गरीब तोंडाचा पाहतात. ज्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला अशी व्यवस्था असल्याचे सांगत पडळकरांनी पवारांवर टीका केली.  


ते म्हणाले की, सचिन वाझे प्रकरणात अनिल देशमुख यांनी राजीनामा देताच जयंत पाटील खुलले होते. मात्र शेवटी गृहमंत्रीपद गरीब अशा वळसे पाटील यांना दिल्याचे पडळकर यांनी सांगितले. तुमच्या 35 गावाला पाणी न देण्याचे कारण देखील तसेच होते. जर तुम्हाला पाणी दिले असते तर यांचा ऊस कुणी तोडला असता असं ते म्हणाले.  राज्यात सीबीआयला येऊ देणार नाही म्हणणारे माजी गृहमंत्री आता त्यांच्याच चौकशीला सामोरे जात आहेत, असं पडळकर म्हणाले. 


यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील सरकार लवकरच जाईल असे सांगितले. मुंबईत घरपोच दारू देता मग गोरगरीब जनतेला घरपोच धान्य आणि भाजीपाला द्यायला काय हरकत आहे असा सवाल दरेकरांनी केला.


अजित पवारांचे बोलणे टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं - गोपीचंद पडळकर


अजित पवारांचे बोलणे टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं आहे, अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली होती. अजित पवार यांनी कासेगावच्या सभेत पडळकरांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की,  "सध्या एक नेता तुमच्याकडे जोरदार भाषणे करत फिरतोय, त्याचे डिपॉझिट सुद्धा त्याला बारामतीमध्ये वाचवता आलं नव्हतं आणि आता हा कोणाच्या तोंडाने मतं मागतोय? ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आलं नाही तो तुम्हाला सल्ले देतोय," असे म्हणत अजित पवार यांनी धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडवली होती.


Pandharpur Bypoll | कासेगावच्या प्रचारसभेत अजित पवारांची तुफान टोलेबाजी; पडळकर, पाटील यांना चिमटे