Prasad Lad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतू त्वरित चूक दुरुस्त केली. पण कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.
राष्ट्रवादीसह शिवसेनेचा हल्लाबोल
प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध स्तरातून त्यांचा निषेध केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादीनं त्यांचा व्हिडीओ शेअर करत, दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, असं म्हटलं होतं. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टीका केली होती. भारतीय जनता पक्षानं (BJP) इतिहास संशोधन मंडळाची नव्यानं स्थापना केलीय का? असा खडा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याची यांची लायकी नसल्याचे राऊत म्हणाले होते.
प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचे प्रसाद लाड म्हणाले होते. कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता विरोधकांनी लाड यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.
आधी वक्तव्य नंतर दिलगिरी
छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतू, त्वरित चूक दुरुस्त केल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे लाड यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: