मुंबई : राम मंदिरासाठी (Ram mandir) एक कोटी रुपयांची देणगी कुणी दिली? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मार्फत उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी एक कोटींची देणगी दिल्याचं नितेश राणे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांचाही समाचार घेतला. मिमिक्रीचे समर्थन करणारे म्याऊ म्याऊचे समर्थन करणार का? असे म्हणत नितेश राणेंचा संजय राऊत यांना उलट सवाल केला. ठाकरेंना फक्त निवडणुकांपूर्वी रामाची आठवण येते. चायनीज मॉडेल हिंदू म्हणत राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना टोला लगावला. 


संजय राऊतांवर हल्लाबोल -


संसदेमध्ये कलाकार असतात, असे म्हणत आमच्या उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्यांचा हे अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत. तुम्हाला कोणाची मिमिक्री करणे, कोणाचा आवाज काढणे एवढेच समर्थन करत असाल. तर  मालकाच्या मुलाला चालत असताना बघून म्याऊ म्याऊ चा आवाज काढला गेला, तेव्हा  मालकाला एवढं का झोंबलं? मग त्या म्याऊ म्याऊ चं पण समर्थन करायला पाहिजे होतं. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे संजय राजाराम राऊत यांची घाणेरडी सवय झालेली आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली. 


नितेश राणेंचा हल्लाबोल - 


संजय राऊत आणि त्याचा मालक (उद्धव ठाकरे) म्हणे रामल्लला काय भाजपची प्रॉपर्टी आहे की? अयोध्येच्या सातबारावर काय भाजपचे नाव आहे का? रामल्ललावर कडवट हिंदूंचा अधिकार आहे. अयोध्येत जिथे राममंदिर उभं राहतंय, त्याच्या सातबाऱ्यावर समस्त हिंदूंचे नाव आहे, असे नितेश राणे म्हणाले. 


तुमच्यासारख्या धर्मांतर झालेल्या, लव जिहाद झालेल्या, दाडी कुरवळत बसलेल्या जिहाद्यांचे नाव नाही आहे. तुझ्यासारखे चायनिज मॉडेल हिंदू ज्यांना रामाची आठवण फक्त निवडणुकीच्या निमित्ताने येते. 2019 ला मालकाची घोषणा आठवा... पहिले मंदिर फिर सरकार आणि आता मंदिराचे नाव घेतलं की त्याची 10 जनपथवर बसलेली मम्मी कसा कान कुरवळेल हे मग कळेल, असा टोला राणेंनी लगावला. 


राम मंदिरासाठी देणगी सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी दिली आम्ही ऐकलं की ती देणगी एकनाथ शिंदे यांच्याकडून घेऊन दिलेली आहे. हे खरं आहे की खोटं आहे. 1 कोटी हे एकनाथ शिंदे यांचे आहेत की उद्धव ठाकरेंच्या खिशातले आहेत. याचे आधी उत्तर द्यावे मगच देणगी बाबत बोलावे, असे नितेश राणे म्हणाले. 


राम मंदिराचा सातबारा भाजपच्या नाही तर रामाच्या नावावर : राऊत 


रामलल्लाची मालकी यांच्याकडेच आहे अशा प्रकारे ते मत मागतात. राम लल्लाच्या मंदिरासाठी जर कोणी मोठे दान दिलं असेल तिथे शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी एक कोटी रुपये त्यावेळी दिले. त्या ठिकाणचा सातबारा हा रामाच्या नावावरती आहे भाजपच्या नावावरती नाही, असे राऊत म्हणाले.