Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. परखड भाष्य करणाऱ्या, भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सूडापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. देशात हुकूमशाहीचं टोक गाठलं असून हिटलरलाही मागे टाकलं असल्याचे राऊत यांनी म्हटले. 


अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना व इतर पक्षातील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास देणे सुरू आहे. हा राजकीय सूड, द्वेष भावनेतून कारवाई केली जात आहे. मु्ंबईत अनिल परब यांना नोटीस आली आहे. दिल्लीतही मागील तीन दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीदेखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. असे प्रकार काही दिवस सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. ही हुकूमशाहीची सुरुवात आहे, असं मी मानत नाही. पण हुकूमशाहीचं टोक गाठलं आहे. आपली सत्ता टिकवण्यासाठी राजकीय विरोधकांना संपवण्याचे असे काम हिटलरनेदेखील केले नसेल


देशातील लोकशाहीचा डंका जगभरात वाजवला जातो. त्याच भारतात लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. हा देशाच्या स्वातंत्र्याचा पराभव असल्याचेही त्यांनी म्हटले. हा पराभव भाजपच्या नेतृत्वातील सरकारने केला आहे. त्यामुळे आणखी एका स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. 


यंत्रणा दबावात असल्याचा आरोप


देशातील कोणत्या यंत्रणा स्वंतत्रपणे काम करतात याचा शोध घेतला पाहिजे. कोणत्याही यंत्रणा स्वतंत्रपणे काम करताना दिसत नसून त्या दबावा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेनेचे मत रद्द करण्यासाठी साडेसात तास लावले. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्लीतून कोणी फोन केले, कोणत्या सूचना दिल्यात याची माहिती आम्हाला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून आम्हाला तिथे न्याय मिळेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.