लातूर : सत्तेची नशा कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि भाजप नेते पाशा पटेल यांच्याही डोक्यात गेली आहे. कारण केवळ पेट्रोल दरवाढीवर एका पत्रकारानं प्रश्न विचारल्यानंतर संताप अनावर झालेल्या पाशा पटेल यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे.


लातूर विश्रामगृहात हा सगळा प्रकार घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांच्यासह पत्रकार आणि काही शेतकरीही उपस्थित होते.

'पेट्रोलची भाववाढ झाली, शहरात येण्यासाठीही शेतकरी आता विचार करेल, सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली का?' असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्यावर पाशा पटेल भडकले आणि शिवीगाळ केल्याचा दावा पत्रकाराने केला आहे.

मला बसून प्रश्न वाचरतो का औकात आहे का, असं बोलत पाशा पटेल यांनी प्रचंड शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झालं आहे. पत्रकार विष्णू भुरगे यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.

पाशा पटेल हे लातूरच्या दौऱ्यावर आले होते. लातूरच्या विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषद होती. त्याच्या वार्तांकनासाठी पत्रकार पोहचले असताना पत्रकाराने हा प्रश्न विचारला आणि त्यावर पाशा पटेल भडकले.

दरम्यान, स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बसून संबंधित व्यक्तीने माझा अपमान केल्याचा दावा पाशा पटेल यांनी केला आहे. 'कार्यकर्त्याप्रमाणे तो माझ्याबरोबर बोलत होता. मी विचारलं, तुझं वय आहे का माझ्या वयाच्या व्यक्तीशी असं बोलण्याचं? त्यानंतर झालेल्या शाब्दिक चकमकीत माझा पारा चढला आणि मग त्या व्यक्तीने आपण पत्रकार असल्याचा सांगितलं', असं पटेल म्हणाले.