मुंबई : उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करा असे सांगितले आहे. माझ्यावर कधी गुन्हा दाखल करणार याची मी वाट पाहत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी गुन्हा दाखल करावा, असे आव्हान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे. मी चोरी पकडली याची खुन्नस लिपिकाला नोटीस पाठवून काढत आहेत. ज्यांनी फोटो काढला त्यांना नोटीस दिली नाही. फोटो कोणी काढला हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. पण त्याला नोटीस दिली नाही. त्यांनी त्या लिपिक कुटुंबाची माफी मागावी असे सोमय्या म्हणाले.


नोटीस पाठवून दादागिरी आणि ठोकशाही सुरू असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. गरीब टाईप रायटवर बदला घेण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कोणत्या कायद्याच्या आधारे नोटीस काढली असल्याचा सवालही यावेळी सोमय्या यांनी केला. माफिया सेनेची ही गुंडगिरी असल्याचे सोमय्या म्हणाले. 
प्रताप सरनाईक यांना नोटीस का देण्यात आली नाही असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लढावे गुंड असणाऱ्या प्रताप सरनाईक यांना पाठवू नका असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शैलीची गुंडगिरी सहन करणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.


नगरविकास विभागाच्या अधिकार्‍याच्या खुर्चीवर बसून कागदपत्रे तपासणे आणि मंत्रिमंडळाची गोपनीय टिपणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना कशी दिली गेली. याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. याप्रकरणी जनमाहिती तथा कार्यासन अधिकारी पु. म. शिंदे यांनी सोमय्या यांना नोटीस बाजावून खुलासा मागितला आहे.


नेमकं प्रकरण काय


भाजपचे नेते किरीट सोमय्या हे मंत्रालयात नगरविकास विभागाच्या अधिकार्‍याच्या खुर्चीवर बसून फायली तपासत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील बांधकाम प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत दंड व व्याजमाफी देण्यात आली होती. या विषयाची गोपनीय टिपणीही सोमय्या यांना देण्यात आली. त्यावर या सगळ्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली होती.


सोमय्या मंत्रालयात नगरविकास विभागाच्या अधिकार्‍याच्या खुर्चीवर बसून फायली तपासत होते. तर त्यांनी माहितीच्या अधिकारात तशी परवानगी घेतली होती का? आणि परवानगी घेतली नसेल तर त्यांच्यावर सरकारी कार्यालयात घुसून सरकारी फायलीची चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.