Vijay Wadettiwar ob BJP: मोहन भागवत 3 मुलं पैदा करा असे सांगतात. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात मतदारयादीत एका बापाला 56 मुलं दाखवली. भाजपने मत चोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्रातील मतदारचोरांना धडा शिकावण्यासाठी ही सभा घेतली जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राज्य सरकारने मराठा ओबीसी यांना झुंजवल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात 'वोट चोर, गद्दी छोड' या काँग्रेसच्या कॅम्पेनची आज कामठी येथून सुरवात झाली. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनीही जोरदार हल्लाबोल केला. सपकाळ म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकमोहन भागवत यांनी मोदींना खुर्ची खाली करण्यास सांगितलं आहे. देशात मध्यवर्ती निवडणूका लागणार असल्याचा दावाही सपकाळ यांनी केला.
400 पार नार दिला कारण संविधान बदलवायचे होते
दरम्यान, यावेळी बोलताना सुनील केदार म्हणाले की, लोकसभेत 400 पार नार दिला कारण यांना संविधान बदलवायचे होते. संविधानच्या भरवश्यावर स्वातंत्र्य मिळालं असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या सहा महिन्यात मोदी सरकार दिसणार नाही, संघर्षाला पुढे जायचं असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आम्ही पंचायात समिती आणि जिल्हा परिषद जिंकणार आहे. एक जरांगे दिसला, तर मुंबईत थयथयाट झाला. सामान्य माणूस रस्त्यावर आला तर तुम्हाला जागा मिळणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. भाजपचे माजलेले (अधिकारी ,नागपूर कलेक्टर भाजपाला मुजरे करतात) लोक तुमच्या दारात उभे करू, पोलीस अधिकारी असो की कलेक्टर असो तुमच्या दारात मुजरे लावायला लावील असा शब्द देतो, असे सुनील केदार म्हणाले. सुनील केदार हा तुम्हाला मुजरा करायला लावल्याशिवाय सोडणार नाही अशी ग्वाही देतो, असेही ते म्हणाले.
'मोदी देशाला तोंड दाखवू शकणार नाहीत'
दुसरीकडे, बिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची मतदार हक्क यात्रा पार पडली. राहुल गांधी यांनी आता समारोपाच्या सभेत मोठी घोषणा केली. राहुल गांधी मत चोरीवरून भाजपला सतत कोंडीत पकडत आहेत. दरम्यान, त्यांनी आता म्हटले आहे की आम्ही महादेवपुरात अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार आहे. मोदी देशाला तोंड दाखवू शकणार नाहीत. बिहारमध्ये एसआयआर (मतदार यादी सुधारणा) आणि मत चोरीविरुद्ध 17 ऑगस्ट रोजी ही यात्रा सुरू झाली होती. ही यात्रा सासाराम येथून सुरू झाली. बिहारमधील सुमारे 25 जिल्ह्यांमधून 1300 किमी अंतर कापून ही यात्रा आता पाटण्यात संपली.
राहुल गांधी यांनी मत चोरीवर निशाणा साधला
राहुल गांधी यांनी यात्रेच्या समारोपाच्या वेळी सांगितले की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून निवडणुका चोरल्या गेल्या. लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत सुमारे 1 कोटी नवीन मतदार जोडले जातात. नवीन मतदार येतात आणि मतदान करतात. लोकसभेत आमच्या युतीला मिळालेली मते विधानसभेतही सारखीच होती. सर्व नवीन मते भाजपच्या खात्यात गेली. आम्ही लोकसभा जिंकली पण विधानसभेत आमचे तिन्ही बलाढ्य पक्ष नामशेष झाले.
राहुल गांधी पुढे म्हणाले, कारण निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मते चोरली. त्यानंतर आम्ही स्पष्टपणे दाखवले की महादेवपुरातील एका भागात 1 लाखाहून अधिक बनावट मतदार होते. निवडणूक आयोगाने आम्हाला मतदार यादी, व्हिडिओग्राफी दिली नाही. राहुल गांधी म्हणाले, आता भाजपने ही महत्त्वाची गोष्ट ऐकावी. भाजपबद्दल ते म्हणाले, तुम्ही अणुबॉम्बचे नाव ऐकले आहे, त्यापेक्षा मोठा हायड्रोजन बॉम्ब आहे. आम्ही महादेवपुरात अणुबॉम्ब टाकला. भाजपवाल्यांनो, तयार व्हा, हायड्रोजन बॉम्ब येत आहे. मत चोरीचे सत्य संपूर्ण देशाला कळणार आहे. हायड्रोजन बॉम्ब नंतर, मोदी या देशाला तोंड दाखवू शकणार नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या