मुंबई : महाराष्ट्रासह देशभर आज दहीहंडीचा उत्साह दिसून आला. दोन वर्षानंतर महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह दिसून आला. पुन्हा एकदा मुंबई ठाण्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यापैकी बऱ्याच ठिकाणी भाजपचीच छाप दिसून आली. तर दहीहंडी म्हटलं की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची जी छाप दिसून यायची त्याजागी मात्र भाजपची आणि शिंदे गटाची छाप दिसून आली आहे. 


आज मुंबईत जिथे दहीहंडी होती तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार होतं. म्हणजे आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र घरातून बाहेर पडले ते रात्री उशिरापर्यंत फक्त दहीहंडीच्या सोहळ्यांनाच हजेरी लावत होते. मराठी माणसाच्या सणाच्या आडून भाजपनं मुंबई महापालिकेआधी मराठी मतदारांना साद घातली आहे का? असा प्रश्न पडला आहे. 


विशेष म्हणजे यंदा या सोहळ्यावर  फक्त आणि फक्त भाजप आणि शिंदे गटाची छाप होती. ठाण्यात प्रकाश सुर्वे, घाटकोपरला राम कदम, वर्तकनगर प्रताप सरनाईक, टेंभी नाक्याला एकनाथ शिंदे, जांबोरी मैदान आशिष शेलार,  ठाण्यात शिवाजी गावडे पाटील, कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक, पुण्यात बावधनमध्ये किरण दगडे पाटील अशा भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या हंड्या या जल्लोषात झाल्या. 


कधीकाळी ज्या सणावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची छाप होती. ती आता भाजपच्या बाजूने वळली आहे. कारण ठाण्यातली संघर्ष प्रतिष्ठानची जितेंद्र आव्हाड आयोजित दहीहंडी कोरोनात बंद झाली. ती यंदाही बंदच राहिली. शिवसेनेची वरळीतल्या  जांबोरी मैदानावरची दहीहंडी दुसरीकडे स्थलांतरित झाली. त्यातल्या त्यात ठाण्यामध्ये राजन विचारे यांच्या दहीहंडीत आणि वरळीच्या श्रीराम मिलच्या हंडीमध्ये थोडीफार रंगत दिसली. 


त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये मराठी मतदारांना साद घालणारे सण तोंडावर आहेत आणि ते सण निर्बंधांविना आयोजित करुन मराठी मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे, दहीहंडीला खेळाचा दर्जा देणे, गोविंदांना सुरक्षा कवच देणे हे त्याचंच द्योतक आहे.  गोपाळकाला तो झांकी है...आता गणेशोत्सव, दसरा, दिवाळी बाकी है... 


महत्वाच्या इतर बातम्या


Dahi handi 2022 : दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा


Dahi Handi 2022 : गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात दाखल गुन्हे मागे घेणार; राज्य सरकारची घोषणा