सांगली: महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या सुपर मार्केटमधील वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात आपण कोर्टात जाऊ आणि रस्त्यावरची लढाईदेखील लढू असा निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळे घराबाहेर पडला की एकवेळ दूध मिळणार नाही पण दारू मात्र लगेच मिळेल असाही टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. 


शेतकऱ्यांच्या धान्याची दारू करायची आणि शेतकऱ्यांच्याच पोराला ती दारू पाजायची असा हा सरकारचा कारभार आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राज्यात वर्षानुवर्षे काँग्रेसचे राज्य होतं, पण सर्रासपणे वाईन विक्री सारखा भीषण निर्णय कधी घेतला गेला नाही. तरुण पिढी बरबाद करण्याचा हा डाव आहे. या निर्णयाचे उदात्तीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणार आहे असं गोंडस रूप सरकारकडून दिलं  जातंय. पण  गेल्या 27 महिन्यांमध्ये निसर्ग वादळ आलं, महापूर आला, अतिवृष्टी झाली तरी शेतकऱ्यांला भरपाई मिळाली नाही. कर्जमाफी आणि विमा देखील  शेतकऱ्यांना भेटला नाही. पण कुणाच्यातरी फायद्यासाठी आणि आग्रहाखातर वाईन सर्रासपणे विक्रीस परवानगी दिली जातेय."


चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, "घराबाहेर पडलो की एकवेळ दूध लवकर मिळणार नाही पण दारू लगेच मिळेल. हा निर्णय केवळ वाईन इंडस्ट्रीमधील काही लोकांच्या फायद्यासाठी घेतलाय आणि या वाईनच्या विक्रीतून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल असे गोंडस रूप या निर्णयला दिलं जातंय. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला तर तुमच्या पोटात दुखतंय का असा प्रश्न जे नवाब मलिक आम्हाला विचारत आहेत. त्या नवाब मलिक यांना शेती, शेतमाल केव्हापासून कळायला लागली?"


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आता खूप कारणे साचली आहेत. सरकार बरखास्त करण्यासाठी वाईन विक्रीच्या निर्णयाची काही गरज नाही. वाईन विक्रीच्या निर्णयाबरोबरच खूप कारणे आहेत, ज्याने हे सरकार बरखास्त होऊ शकते. घटनाबाह्य निर्णय घेण्याचे 10 प्रसंग  महाराष्ट्र मध्ये घडलेत. त्यामुळे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करायला खूप कारणे आहेत, पण दारूच्या विषयावरची लढाई कोर्टात आणि रस्त्यावर लढावी लागेल."


महत्त्वाच्या बातम्या: