Chandrakant patil BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे नंतर 24 तास ते जागेच राहतील, असे वक्तव्य भाजप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे केले आहे. ते कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.


झोपच लागणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयोग करत आहेत. आता मोदी दोन तास झोपतात, नंतर ते 24 तास देखील झोपणार नाहीत. 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. संसदेत अनेक गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी एक तृतीयांश बहूमत पाहिजे. कोणत्या गोष्टी करायच्यात, ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे कामाला लागा, 2024 मध्ये आपलीच सत्ता आली पाहिजे असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र यांनी 60 देशांना लस पुरवली आहे. आपण दाखवून देऊ की हिंदू जगाला किती उपयोगी ठरतोय. यापूर्वी दोनवेळा हिंदूचे देशात वर्चस्व झालं होतं. पृथ्वीराज चौहान यांच्या काळात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि आता नरेंद्र मोदींच्या काळात हिंदूचे वर्चस्व होतं. याचा अर्थ मी शिवाजी महाराज यांच्याशी मोदींची तुलना करत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, यासोबतच कोल्हापूरची पोटनिवडणूक भाजप जिंकण्यासाठीच लढवेल असा निर्धार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकीत सत्यजीत कदम यांच्या उमेदवारीची शिफारस दिल्लीकडे करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसेचे दिवंगत माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीने निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली, तर त्यांना उमेदवारी देऊ असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 


शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंनी सर्वांना एकत्र बोलावून राजकीय धुळवड थांबवावी ; चंद्रकांत पाटलांचे आवाहन - 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वांना एकत्र बोलावून सध्या राज्यात सुरू असलेली चिखलफेक थांबवावी असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्यभर आज धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हाच धागा पकडत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सध्या राज्यात सुरू असलेली राजकीय धुळवड थांबवावी असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.  चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात अनेक प्रश्न आहेत. महिलांवरील आत्याचार वाढत आहेत. परंतु, कोणाला अटक होत नाही. एसटी कामगारांचा प्रश्न सुटत नाही, मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला जात नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींची काल राज्यभर भाजपकडून होळी करण्यात आली. धुळवडीनिमित्त एकमेकांवर रंग फेकले जातात. या रंग फेकाफेकीमध्ये आनंद असतो. परंतु, सध्या राज्यात एकमेकांवर करण्यात येत असलेल्या फेकाफेकींमुळे या राजकीय धुळवडीत आनंद नाही, तर प्रत्येकाला दुख: आहे. ही फेकाफेकी थांबवण्यासाठी कोणी पुढाकार घ्यायचा याबाबत एकमत होत नाही. "