बारामती : बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना उचलून घेत आमदार राहुल कुल यांनी जेजुरी गडाच्या पाच पायऱ्या चढल्या. यानंतर गड़ावरील 42 किलोची खंडा तलवारही आमदार राहुल कुल यांनी उचलून घेतली. याआधी सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळेंनीही शिवरात्रीला खंडेरायाचं सपत्नीक दर्शन घेतलं. सदानंद सुळेंनीही सुप्रिया सुळेंना उचलून घेत जेजुरी गडाची पायरी चढली होती.



बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा आज जेजुरी भागात प्रचार दौरा होता. यावेळी महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन त्यांनी घेतलं.  यावेळी कुल दाम्पत्यांने जेजुरीच्या खंडेरायाचे पारंपरिक पद्धतीने दर्शन घेत महापूजा केली.

...जेव्हा सदानंद सुळेंनी सुप्रिया सुळेंना उचलून जेजुरी गडाची पायरी चढली




नवदापत्य खंडेरायाच्या दर्शनाला आल्यानंतर पती नववधूला उचलून घेत जेजुरी गडाच्या किमान पाच पायऱ्या तरी चढतो, अशी प्रथा आहे. कार्यकर्त्यांनी कुल याना तसा आग्रह केला. त्याला मान देत आमदार राहुल कुल यानी उमेदवार कांचन कुल याना पाच पायऱ्या चढत उचलून घेतलं. यानंतर जेजुरी गड़ावरील 42 किलोची खंडा तलवारही आमदार राहुल कुल यांनी उचलून घेतली.

सध्याच्या दुष्काळातून शेतकरी बाहेर पडू दे आणि बारामती मतदार संघाचा संपूर्ण विकास करण्याची शक्ती आम्हाला दे, असं साकडं खंडेरायाला घातल्याचं आमदार राहुल कुल यानी सांगितलं.  खंडेरायाच्या दर्शनानंतर कांचन कुल यांच्या प्रचारार्थ जेजुरीतून ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा काढण्यात आली.