पुणे : बिहार विधानसभा निवडणुकाचे कल समोर येत आहेत. एनडीए आणि महागठबंधन यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. बिहार निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. बिहारमधील निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे सर्व मोठे नेते प्रचारामध्ये होते. तर दुसर्‍या बाजूला एक अनुभव नसलेला तरुण नेता (तेजस्वी यादव) निवडणूक लढवत होता. त्यामुळे तेजस्वी यादव यांना जेवढ्या काही जागा मिळतायत ते त्यांचं यश म्हणायला लागेल. तेजस्वी यादव यांच्या या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल आणि इतरांनाही मार्ग दिसेल, असं शरद पवार यांनी म्हटलं. बिहारमध्ये राजद सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर आहे. बिहारमध्ये कलांनुसार एनडीएची आघाडी कायम असून एनडीए 123 तर महागठबंधन 112 जागांवर पुढे आहे.


बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काही जागा लढवत होती. परंतु तेजस्वी यादव यांना मदत व्हावी यासाठी आम्ही या निवडणुकीकडे फारसं लक्ष दिलं नाही. बिहारमधील निवडणूक निकालाचा परिणाम इतर राज्यांवर कसा होईल हे सांगता येणार नाही. तामिळनाडूमध्ये तर परिणाम होईल असं वाटत नाही. पश्चिम बंगालमध्ये काय होईल हे बघावे लागेल, असंही शरद पवार यांनी सांगितलं.


देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्याचा दावा केला जातोय त्याबद्दल शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं की, आमच्या डोक्यात ही गोष्ट आली नव्हती ती आणून दिल्याबद्दल धन्यवाद.


उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीत राजकारणावर चर्चा नाही


कालच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत विचारलं असता, मी काल मुख्यमंत्र्यांना रयत शिक्षण संस्थेचे कडून देण्यात आलेल्या मदतीचा चेक सुपूर्द करण्यासाठी भेटलो. या भेटीत राजकारणावर आणि विधानपरिषदेच्या जागांबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही.


Bihar | बिहारमधल्या यशाबद्दल फडणवीसांचं अभिनंदन, तरी तेजस्वी यादवांनी सर्वांना घाम फोडला - संजय राऊत