भिवंडी : त्रिपुरा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या अफवांचे लोण आता महाराष्ट्रातही पसरले आहे. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात तीव्र पडसाद मुस्लिम धर्मीयांमध्ये उमटत आहेत. या विरोधात रझा अकादमी आक्रमक झाली असून भिवंडीत रझा अकादमीचे अध्यक्ष शकील रजा यांनी भिवंडी बंदचे आवाहन केल्याने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यां मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र शहरातील प्रभुआळी मंडई, बाजारपेठ या भागात दुकान बंद न झाल्याने एका मोटारसायकलवर आलेल्या टोळीने व्यापाऱ्यांची जबरदस्ती दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी विरोध करून पोलिसांना माहिती देताच या टोळीने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र आळशी, अविनाश सिकची, अजित कलंत्री यांच्या सह 10 ते 15 व्यापाऱ्यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेल्या प्रकारा बाबतीत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल वडके यांनी घटनास्थळी धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, सर्व व्यवहार वाहतूक सुरळीत सुरू असल्याने बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
रजा अकादमीने पुकारलेल्या बंद निमित्त भिवंडी शहरात गुरुवार रात्रीपासूनच नाकाबंदी व ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. तर या बंदला काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,समाजवादी पार्टी ,एमआयएम या प्रमुख राजकीय पक्षाने, सुन्नी जमियते उलमा यांसह विविध धार्मिक संस्थांनी बंदला समर्थन जाहीर केला होता.
भिवंडी शहरातील दिवाणशाह दर्गा रोड, शास्त्रीनगर कल्याण रोड, शांतीनगर, गैबिनगर, नवीबस्ती, वंजारपाट्टी नाका, मिल्लत नगर , वंजारपट्टी नाका, समदनगर , पटेल कंपाऊंड, फातमानगर, नुरीनगर नगर, अवचित पाडा रोड अशा विविध भागात बंदचा प्रभाव जाणवला असून या भागातील दुकान, आस्थापने बंद ठेवण्यात आले होते. तर धामणकर नाका, पद्मानगर, बाजरपेठ, नझराना रोड, शिवाजी नगर, कोंबडपाडा अशा विविध ठिकाणी सर्व दुकान सुरळीत सुरू होती. रजा अकादमी तर्फे त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करणारे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देऊन आपला निषेध व्यक्त केला आहे. तर शुक्रवारच्या नमाज नंतर नागरीक रस्त्यावर उतरून निदर्शने करण्याचा अंदाज असल्याने पोलिसांनी स्व. आनंद दिघे चौकात कडक बंदोबस्त ठेवला होता.
संबंधित बातमी :