ठाणे : भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड तालुक्यातील पोलिस पाटलांची विविध प्रवर्गातून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. 26 ऑक्टोबरपूर्वी अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
20 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे. अर्जदार किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा तत्सम किंवा उच्चतम शैक्षणिक अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. वयाची किमान 25 आणि कमाल 45 वर्षे पूर्ण तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम, निष्कलंक चारित्र्याचा उमेदवार असावा, अशी अट आहे.
उमेदवार गावचा स्थानिक रहिवासी असावा, त्याचप्रमाणे त्याच्या नावे जमीन असावी, असं अटींमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
यासाठी प्रथम 80 गुणांची वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरुपाची परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत 45 % गुण प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरतील. ही परीक्षा 20 गुणांची असणार आहे.
परीक्षेसाठी करावयाचा अर्ज 30 रुपये भरुन संबंधित तहसीलदार कार्यालयात मिळेल. हा अर्ज हस्तांतरणीय नाही. भरलेला अर्ज पोस्टाने पाठवायचा नाही. असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सोबत जोडायच्या कागदपत्रांची माहिती अर्जासोबत दिली आहे. सर्वसाधारण उमेदवारास 400 रुपये शुल्क आणि उर्वरित सर्व उमेदवारांकडून (महिलांसह) 200 रुपये शुल्क घेण्यात येईल.
रितसर कागदपत्रांसह भरलेले अर्ज भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड यांच्या कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार किंव्वा महसूल नायब तहसीलदार किंवा फौजदारी लिपिक यांच्याकडे समक्ष सादर करायचा आहे. पात्र तसेच अपात्र उमेदवारांची यादी 2 नोव्हेंबर रोजी लावण्यात येईल.
हरकतींचा विचार करून 7 नोव्हेंबर रोजी अंतिम यादी तयार करण्यात येईल आणि 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत लेखी परीक्षा होईल, असे पोलिस पाटील निवड समितीचे अध्यक्ष आणि भिवंडी आणि कल्याणच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी कळवलं आहे.