भिवंडी : 'सैराट' चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु अर्थात आर्चीची कॉलेजमध्ये बुलेटवरील एन्ट्री खूपच चर्चेचा विषय ठरली. तेव्हापासून गावखेड्यातील मुलींमध्येही बुलेटचं आकर्षण वाढलं. भिवंडी तालुक्यातील आमणे गावात नवरीने लग्नमंडपात करवल्यांसह बुलटेवरुन एन्ट्री केल्यामुळे नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी आवक् झाली.


प्रणाली विश्वजित केणे (वय २२ वर्ष) असं या नवरीचं नाव असून चैताली विजय खुटले (वय २१ वर्ष) आणि आशिकी किरण पाटील (वय २० पाटील रा. कासार वडवली) अशी करवल्यांची नावं आहेत.

प्रणालीला लहानपणापासून दुचाकीची चालवण्याची आवड आहे. तिने बी.कॉमपर्यंतच शिक्षण पूर्ण करुन बँकिंग डिग्री प्राप्त केली आहे. कल्याणमध्ये महाविद्यालयात शिकत असताना ती बुलेटवरुनच जायची. शिवाय हौसेखातर फिरण्यासाठी ती बुलेटवरुनच जात असे. प्रणालीला तिचा भाऊ विशालने रक्षाबंधनची भेट म्हणून बुलेट दिली होती.

प्रणालीचं लग्न ठाण्यातील योगेश संदीप भोईरशी होतं. मंगळवारी (8 मे) सायंकाळी लग्न समारंभ धुमधडाक्यात पार पडला. लग्नाची वेळ 6.20 वाजता असल्याने भटजीने मंगलाष्टकांना सुरुवात केली. वऱ्हाडींसह पै-पाहुण्यांच्या नजरा नवरीच्या आगमनाकडे वळल्या. मात्र प्रणालीने पती योगेशसह वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी बुलेटवरुन एन्ट्री केली. हे दृश्य पाहून सर्वच पाहुणे अवाक् झाले.

या नवरीचा बुलेटवरील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात हा विषय चर्चेचा ठरला आहे. आजच्या तरुणांमध्ये बुलेटचं खूपच आकर्षण आहे. मात्र याबाबतीत मुलीही काही मागे नाहीत, हे नवरीच्या बुलेट एन्ट्रीवरुन दिसून आलं.