Bharat Gogavale : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा ( Guardian Minister of Raigad district) अद्यापही कायम आहे. राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनाच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावं अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली आहे. तर दुसरीकडे मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनाच पालकमंत्रीपद मिळावं असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. अशातच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
एकीकडे 15 ऑगस्टपर्यंत रायगड जिल्ह्याचा तिढा सुटेल असं वक्तव्य राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केलं होतं. आता पुन्हा मंत्री भरत गोगावले यांनी नवा सूर लावत 15 ऑगस्ट पर्यंत रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटला तर ठीक नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असे गोगावले म्हणाले. यावरुन एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या भेटी गाठी नंतर कोणता तरी तोडगा निघाला असावा म्हणूनच मंत्री भरत गोगावले अशी सौम्य भाषा करत आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना शिंदे घट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच
महायुती सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले, तरीही रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर झालेला नाही. शिवसेना शिंदे घट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे बोलून वेळ मारुन नेली जात आहे. शिंदेसेनेकडून भरत गोगावले यांनाच पालकमंत्री पद मिळेल, असा ठाम विश्वास नेते बोलून दाखवत आहेत. पालकमंत्रिपद जाहीर झालेले नसले तरी ध्वजारोहण हे भरत गोगावले यांच्या हस्ते करण्याचा मान मिळावा, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. पालकमंत्री पदीही भरत गोगावले यांनाच नियुक्त करा, अशी भूमिका शिंदेसेनेकडून मांडली जात आहे.
राज्य सरकारकडून 18 जानेवारी 2025 रोजी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली. यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे आणि नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले आणि नाशिकमधून दादा भुसे हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर अवघ्या एक दिवसात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. यानंतर आजपर्यंत रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपद रखडलं आहे.
महत्वाच्या बातम्या: