Bhandara Rain News : राज्यातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. भंडारा (Bhandra) जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत असल्यामुळं गोसीखुर्द धरणाच्या (Gosikhurd Dam) पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 48 तासापासून गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे 25 दरवाजे उघडले आहेत. धरणातून 97232 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 


पुजारीटोला आणि धापेवाडा धरणातून पाण्याचा  विसर्ग सुरु 


मागील दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. जुलै महिना सुरु झाल्यानंतरही पावसानं पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्यानं शेतकरी चिंतातूर झाले होते. मात्र, आता या पावसानं शेती हंगाम जोमानं सुरू झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला आणि धापेवाडा धरणातून पाण्याचा सातत्यानं विसर्ग होत असल्यानं आणि सुरू असलेल्या पावसानं भंडाऱ्याची जीवनदाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीचं पात्र आता दुथडी भरून वाहू लागलं आहे. दरम्यान, पावसाच्या परिस्थितीनुसार आणखी गेट उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये जा  करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.


भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर


2020 मध्ये भंडारा जिल्ह्यात महापूरानं थैमान घातलं होतं. तेव्हापासून भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदी पात्रात भंडारा जिल्ह्यातील उपनद्या ज्यामध्ये सूर, देव्हाडी, बावणथडी, अंधारी, कथनी, गायमुख, आणि नागपूर जिल्ह्यातील कान्हण, खोब्रागडी या नदीच्या पाण्याचा विसर्ग होतो. त्यामुळं वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. कारधा नदीवरील छोटा पुलावरुन वाहतुकीसाठी हा मार्ग भंडारा जिल्हा प्रशासनाने 2016 मध्ये बंद केलेला असतानाही येथून नागरिक जीवघेणा प्रवास करत आहेत. 


वैनगंगा नदी दथडी भरुन वाहत आहे


जुलै महिना सुरु झाल्यानंतरही पावसानं हजेरी न लावल्यानं शेतीची कामं खोळंबली होती. या दमदार पावसानं शेतकरी सुखावला असून, भात पिकाच्या लागवडीला आता जोर आला आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भंडाऱ्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं वैनगंगा नदी दथडी भरुन वाहत आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Bhandara News : गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस,  पाच गेटमधून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा