Bhandara News : एककीडे देश डिजिटल इंडियाच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील भंडारा (Bhandara News) जिल्ह्यात मात्र शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. अवघ्या 15 कुटुंबांचं गाव असलेल्या खैरटोला (Khairtola) येथील चिमुरड्यांना शिक्षणासाठी दररोज अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागते. हे अंतर साधं नसून वाघ, बिबट्या आणि अस्वलांचा वावर असलेल्या घनदाट जंगलातून आहे. विशेष म्हणजे, रस्ता असूनही आणि बस धावत असूनही या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतलं जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Bhandara News : पाठीवर दप्तर आणि डोळ्यात स्वप्न, दररोज मृत्यूच्या छायेतून प्रवास

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त भागात वसलेलं खैरटोला हे चिमुकलं गाव. पण इथल्या मुलांची शिक्षणाची जिद्द हिमालयाएवढी मोठी आहे. मात्र, या जिद्दीच्या आड येतंय ते खंदाळपर्यंत जाणारं अडीच किलोमीटरचं घनदाट जंगल. या जंगलात वाघ, बिबट आणि रानटी डुकरांचा मुक्त वावर आहे. तरीही पाठीवर दप्तर आणि डोळ्यात स्वप्न घेऊन ही मुलं दररोज मृत्यूच्या छायेतून प्रवास करतात. कधी पोटाची खळगी भरण्यासाठी पालक मजुरीला जातात, तेव्हा या मुलांना देवाच्या भरवशावर जंगलातून एकटं जावं लागतं.

Bhandara School Students : बस असूनही एसटीचे कर्मचारी विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू देत नाहीत

कधी शाळेचे मुख्याध्यापक माणुसकी दाखवून आपल्या दुचाकीवर या मुलांना लिफ्ट देतात, तर कधी ही मुलं अनोळखी व्यक्तींकडे हात पसरतात. पण प्रश्न असा आहे की, या चिमुरड्यांच्या सुरक्षेची जबाबदार असलेल्या प्रशासनाला याची पुसटशीही कल्पना नाही का? या मार्गावर एसटी बस धावते. मात्र, 'एबीपी माझा'शी बोलताना विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. बस असूनही एसटीचे कर्मचारी या विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू देत नाहीत. जर बस थांबली असती, तर या मुलांचा जीवघेणा प्रवास थांबला असता.

Bhandara News : पालकांनी मुलांचे शिक्षण थांबवावे की प्रशासनाने आपली झोप मोडावी?

दरम्यान, उद्या जर एखाद्या विद्यार्थ्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला, तर त्याचं पाप कोणाच्या माथी असेल? मजुरी करणाऱ्या पालकांनी मुलांचे शिक्षण थांबवावे की प्रशासनाने आपली झोप मोडावी? बस थांबत नाही आणि रस्ता सुरक्षित नाही, अशा दुहेरी कात्रीत हे विद्यार्थी अडकले आहेत. आता तरी जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभाग याकडे गांभीर्याने पाहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इतर महत्वाच्या बातम्या

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI