Bhandara Leopard Attack : भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या एका विद्यार्थ्यावर वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं जीवघेणा हल्ला (Bhandara Leopard Attack) केला. मध्यप्रदेशातून भंडाऱ्यात येणाऱ्या या विद्यार्थ्यानं मृत्यूच्या जबड्यातून (Leopard Attack) स्वतःची सुटका तर करून घेतली, पण या संघर्षात त्याचं एक महत्त्वाचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ही घटना भंडारा आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या महामार्गावरील तुमसर तालुक्यातील राजापूर तलाव परिसरातील आहे. (Bhandara Leopard Attack)

Continues below advertisement

Bhandara Leopard Attack : गाडी कोसळल्याचा मोठा आवाज झाला आणि बिबट्यानं जंगलाच्या दिशेनं धूम ठोकली

मध्यप्रदेशातील उमरखाडा येथील 22 वर्षीय अतुल रेंभुर्ण हा तरुण आपल्या दुचाकीनं सीतासावंगी येथील परीक्षा केंद्राकडे निघाला होता. राजापूर तलावाजवळ पोहोचताच अचानक एका बिबट्यानं अतुलवर झडप घातली. बिबट्याचा तो भयानक हल्ला पाहून अतुलचा थरकाप उडाला, तो धावत्या गाडीवरून रस्त्यावर कोसळला. सुदैवानं, गाडी कोसळल्याचा मोठा आवाज झाला आणि बिबट्यानं जंगलाच्या दिशेनं धूम ठोकली. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या नागरिकांनी या तरुणाला तातडीनं गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. नशीब बलवत्तर म्हणून तरुण यातून बचावला. मात्र, आयुष्य जरी वाचलं असलं तरी आयुष्यातील महत्त्वाची अंतिम वर्षाच्या परीक्षेचा एक पेपर तो देऊ नं शकल्यानं या विद्यार्थ्याचं एक वर्ष आता वाया जाणार असल्याची भीती या विद्यार्थ्याला आहे.

Continues below advertisement

Bhandara : कोका अभयारण्यात T16 वाघिणीची 'क्रेझ'! व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांची पावलं वळली

नवेगाव - नागिराव व्याघ्र प्रकल्पातील कोका अभयारण्यातून निसर्गप्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही काळापासून पर्यटकांच्या प्रतीक्षेत असलेल्या कोका अभयारण्यात आता 'T16' वाघिणीनं आपलं बस्तान बसवलं आहे. या वाघिणीच्या वारंवार होणाऱ्या दर्शनामुळे पर्यटकांचा ओघ आता कोकाकड वाढू लागला आहे. येथील निसर्गरम्य वातावरणात T 16 वाघीण आता मुक्तपणे वावरताना दिसत आहे. नुकतंच एका नैसर्गिक तलावावर ही वाघीण पाणी पिण्यासाठी आली असताना पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. केवळ पाणी पिऊनच नाही, तर तलावाकाठी असलेल्या झुडपांच्या गारव्यात या वाघिणीनं मनसोक्त विसावा घेतला. वाघिणीचा हा रुबाबदार अंदाज पाहून सफारीसाठी आलेल्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. गेल्या काही वर्षांत कोका अभयारण्यात वाघांचे दर्शन दुर्मिळ झाल्यानं पर्यटकांची संख्या काहीशी रोडावली होती. मात्र, आता T16 वाघिणीचं दर्शन 'हमखास' होऊ लागल्यानं पर्यटकांची पावलं पुन्हा कोकाकडे वळू लागली आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्यानं गाईड्स आणि जिप्सी चालकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.